केज दि.२५ - तालुक्यातील साळेगाव येथे एका महिलेचा राज्य रस्त्यावर मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी दि.२५ रोजी समोर आली होती. प्रथम दर्शनी खून कोणी केला ? हे स्पष्ट झाले नव्हते. मात्र अवघ्या कांही तासातच सदरील घटनेचा उलगडा झाला असून जावयानेच धारदार शस्त्राचे वार करून सासूचा खून केल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील घायगुडा पिंपळा येथील सुलोचना माणिक धायगुडे व त्यांचा पुतण्या अंकुश दिलीप धायगुडे हे साळेगाव येथे रविवारी सकाळी सुलोचना यांचा जावई अमोल वैजनाथ इंगळे यांना कांही कारणास्तव भेटण्यासाठी दुचाकीवर आले होते. मात्र ते भेटून परत अंबाजोगाई ला जात असताना राज्य रस्त्यावरील एका हॉटेल समोर जावई व सासू यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यातच अमोल इंगळे याने चुलती पुतण्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून सुलोचना यांच्या चेहऱ्यावर, मानेवर व हातावर धारदार शस्त्राचे वार करून जखमी केले. त्यातच सुलोचना यांचा मृत्यू झाला व पुतण्या ही जखमी झाला.
दरम्यान सदरील घटनेची माहिती मिळताच केजचे उपविभागीय पोलीस अधिकारी भास्कर सावंत, एपीआय संतोष मिसळे, कर्मचारी अशोक नामदास, श्री. कादरी, अमोल गायकवाड, मंगेश भोले, दिलीप गित्ते यांनी धाव घेऊन श्री.कादरी यांना पोलीस गाडीत केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवले. यामध्ये अंकुश धायगुडे यांनी दिलेल्या माहितीवरून खुनाचा उलगडा झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.