Advertisement

केज शहरात लढवली नामी शक्कल

प्रजापत्र | Friday, 16/04/2021
बातमी शेअर करा

केज दि.१६ - वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 मे पर्यंत कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व आस्थापना बंद आहेत. मात्र जे दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यामधील कांही दुकानदारांनी डोक्याचा वापर करून अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या किराणा मालाची जोड लावत दुकान उघडे ठेवण्याची नामी शक्कल लढवल्याचे केज शहरात दिसून आले आहे.
          राज्यात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकानांना टाळे आहे. यामध्ये हातावर पोट असणारे सर्वात जास्त अडचणीत आले आहेत परंतु पोटाला चिमटा घेत सरकारी आदेश तंतोतंत पालन करत आहेत. मात्र संचारबंदीला सर्वात जास्त विरोध हा मोठ्या दुकांदारांचाच दिसून येत आहे. परंतु हा विरोध झुगारून सरकारने किराणा, मेडिकल, फळे, कृषी यासारखे दुकाने वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
           मात्र यावर पळवाट म्हणून केज शहरातील कांही अत्यावश्यक सेवेत येत नसलेल्या दुकानदारांनी आपल्या इतर साहित्याच्या दुकानांना किराणा मालाची जोड देत दुकानाच्या नावापुढे किराणा शब्द जोडून आस्थापना उघड्या ठेवण्याचा प्रकार सुरू केला आहे.  शहरातील मेन रोडवरील एक दोन दुकानदारांनी असे प्रकार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे किराणाची जोड देऊन दुकान उघडे ठेवतीलही.परंतु किराणा समानाशिवाय ग्राहकाने अन्य एखाद्या वस्तूची मागणी केली तर ते देणार नाहीत का? किराणा नाव जरी दिले तरी ते सर्व वस्तू विकायला ठेवणार आहेत का? रीतसर किराणा दुकानाचा परवाना काढला आहे का ? काढला असला तरी नेमका संचाबंदी काळातच कसा काढला ? हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत.
         दरम्यान हातावरचे पोट असणारे लोक नाविलाजने का होईना घरात बसून असताना मोठ्या दुकानदारांनी अशी पळवाट शोधणे बरे नव्हे अशी चर्चा रंगू लागली असून तालुका प्रशासन यांच्यावर काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Advertisement

Advertisement