Advertisement

'ए दिल है मुश्कील जिना यंहा:जॉनी वॉकर'

प्रजापत्र | Friday, 31/07/2020
बातमी शेअर करा

दासू भगत
मो-9764954726

इंदोर मधील एका मिलमध्ये कामगार म्हणून काम करणारे काझी मियाँ आठ अपत्यांचे अब्बा. मिलच्या तुटपुंज्या वेतनात कसाबसा गाडा रेटत असताना एक दिवस त्यांना डच्चू मिळाला. भांडवलदारासाठी मजूर म्हणजे वापरून घेण्याचे साधनच. शेवटी कशासाठी पोटासाठी म्हणत सगळे लटांबर घेऊन काझी मियाँ मुंबईला पोहोचले. एवढे मोठे खटले कसे चालवायचे? कुटूंब आपल्या अब्बाजानच्या एकट्याच्या जिवावर चालणार नाही हे त्यांच्या दोन नंबरच्या मुलाला बद्रुद्दीनला लक्षात आले. भूक, दारिद्रय,असहाय्यता माणसाला खूप लवकर समज आणते. मग  बद्रुद्दीननेही पडेल ते काम करायला सुरूवात केली. दिवसभर वणवण भटकून कधी आईस कँडी, कधी फळं-भाजीपाला, तर कधी स्टेशनरी जे जमेल ते विकून चार पैसे घरी आणणे आणि बापाच्या हातात देणे हे त्याचे काम. मात्र हे सर्व करीत असतानां त्यांच्या डोक्यात आणखीही विविध प्रकारचे इतर किडे वळवळत असत.30 च्या दशकात नूर मोहंम्मद मेमन उर्फ नूर चार्ली नावाचे एक विनोद वीर कम स्टंटमन होऊन गेले. भारतीय चित्रपटाच्या पहिल्या पिढीतले किंग ऑफ कॉमेडी. या नूर चार्लीचा किडा बद्रुद्दीनला पण चावला होता. तो त्यांचा जबरा फॅन होता. त्यांनी पडद्यावर केले स्टंट हा पठ्ठा स्वत:ही करून बघायचा. सन 1905 मध्ये मुंबईत बेस्ट ही ट्रामसेवा देणारी कंपनी स्थापण्यात आली. बेरोजगार बद्रुद्दीनसाठी बहुतेक काही दरवाजे उघडणार होते. लवकरच त्याला कंडक्टरची नोकरी मिळाली. या कामाने त्याच्या कुटुंबियांना थोडा दिलासा मिळाला. दादरच्या बस डेपोमध्ये त्याला ही नोकरी मिळाली. घंटी वाजवित बद्रुद्दीन प्रवाशांसाठी तिकीटे फाडू लागला. ‘‘पुढील आयुष्यात लोक त्याच्यासाठी तिकीटे फाडणार आहेत’’ याची मात्र त्याला अजिबात कल्पना नव्हती.


बसच्या फेर्‍या करतांना बद्रुद्दीनच्या डोक्यातला किडा मध्येच वळवळ करीत असे. मग तो विविध नकला करून, चित्रविचित्र आवाज करून विशेषत: दारूड्याची नक्कल करून प्रवाशांचा प्रवास मजेशीर करे. एकदा या बसमध्ये प्रसिध्द चित्रपट अभिनेता बलराज सहानी प्रवास करीत होते. त्यांना या आगळ्या कंडक्टरमधला किडा बहुधा दिसला असावा. ते त्यावेळी गुरूदत्तच्या ‘‘बाजी’’ या चित्रपट कथेवर काम करत होते. त्यांनी मग बद्रुद्दीनला एक कल्पना सांगितली. दुसर्‍या दिवशी त्याला गुरूदत्तच्या ऑफिसमध्ये यायला सांगितले. दुसर्‍या दिवशी गुरूदत्त चेतन आनंद सोबत आपल्या ‘‘बाजी’’ या चित्रपटावर चर्चा करत असतांना अचानक एक दारूडा मध्ये आला. त्याने गोंधळ घालायला सुरूवात केली. शेवटी शेवटी तर गुरूदत्तचीच फिरकी घ्यायला लागला. गुरूदत्तने रागाने सुरक्षा रक्षकास बोलाविले या दारूड्याला हाकलून लावा असे सांगितले. बराच वेळ ही मजा बघत बसलेले बलराज सहानीने मग त्या दारूड्याची ओळख करून दिली. ‘बद्रुद्दीन जमालुद्दीन काजी’ असे याचे नाव असून हा दारूडा नाही तर तो दारूड्याचा अभिनय करीत होता.
त्यांच्या या अस्सल दारूड्यावर गुरूदत्त मग जाम फिदा झाला आणि त्याला ‘‘बाजी’’ चित्रपटात काम मिळाले. काम गंमत आहे पहा ज्या पोराने कधी दारूला स्पर्श नाही केला त्याने झक्कास दारूड्याचा अभिनय करून दाखवला. गुरूदत्तने फक्त त्याला कामच नाही दिले तर त्याची एक नवी ओळख निर्माण केली आणि त्याचे नाव ‘‘जॉनी वॉकर’’ असे ठेवले. त्याकाळी स्कॉच व्हिस्कीचा जॉनी वॉकर हा ब्रॅन्ड खूपच लोकप्रिय होता.


गुरूदत्त आणि जॉनी वॉकर ही मित्रांची जोडी पडद्यावर आणि पडद्यामागे अभिन्न राहिली. गुरूदत्त आपल्या या मित्रासाठी पटकथेतही बदल करण्यास तयार होत असत. खरे तर तो काळ असा होता गाणी ही फक्त नायक-नायिकांवर चित्रीत होत पण जॉनी वॉकरच्या अभिनयाने प्रेरित होऊन ओ.पी.नय्यर या संगीतकाराने खास त्याच्यासाठी गाणी कंपोज केली. विशेष म्हणजे महंमद रफी देखील खास त्याच्यासाठी आपला ठेवणीतला आवाज वापरत असत. आणि या कॉम्बिनेशनने धम्माल केली. जॉनी वॉकरची पडद्यावरील एन्ट्रीच चित्रपटगृहात हास्याचे कारंजे उसळून द्यायचे. अगदी साध्या साध्या संवादातून व अचूक टायमिंगमुळे ते पडद्यावर धमाल करीत असत.
असं म्हटलं जातं की विसंगतीतून व्यंग निर्माण होतं. आपला सभोवताल प्रचंड विसंगतीने भरलेला आहे. त्याचे व्यवस्थित आकलन मात्र सर्वांनाच होईल असे नाही. ज्या संवेदनशील माणसाला ते होते तो प्रत्येक माणूस मला कलावंत वाटतो. जॉनी वॉकर ज्या बसमधून आपली नोकरी करीत असे त्या बसमधील अनेक व्यक्तीरेखा त्याने अनुभवल्या होत्या त्यामुळे अनेक प्रसंग साकारताना तो अगदी गर्दीतला आपल्या सारखाच एक वाटे. गुरूदत्त आणि जॉनी वॉकर एकदा कलकत्त्याला गेले. तिथे गुरूदत्तने एका तेल मालिशवाल्याला बघितले. त्याने जॉनी वॉकरला सांगितले त्याच्यावर नजर ठेव तुला ती भूमिका करायची आहे. 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘‘प्यासा’’त जॉनी वॉकरने ‘‘सर जो तेरा चकराए....’’ म्हणत जीवनाचे सार या गाण्यातून व्यक्त केले
फक्त विनोद निर्मिती एवढेच काम नाही तर चित्रपटाच्या कथेमध्ये ही त्यांची महत्वाची भूमिका असे. प्रेक्षकांना हसवित ठेवतानां चित्रपटातील नायकाच्या दु:खातही ते समरस होत. त्यामुळे त्याकाळात हास्य अभिनेत्यांना लोकप्रियतेसोबत सन्मानाची वागणूकही मिळे. पुढच्या काळात जसजसे हे कमी होत गेले जॉनी वॉकरने काम कमी केले. टॅक्सी ड्रायव्हर, नया दौर आणि मधूमती या चित्रपटात त्यांनी अप्रतिमच काम केले आहे. मधूमतीसाठी त्यांना फिल्म फेअर पुरस्कारही मिळाला. यातील त्यांचे ‘‘जंगल मे मोर नाचा किसीने ना देखा’’ जबरदस्तच होते....1968 मधील ‘‘शिकार’’ या चित्रपटातील तेजू (जॉनी वॉकर) आणि महूआ(बेला बोस)ची जोडी पण मस्त. या चित्रपटातला त्याचा ग्रामीण भोळसर तेजू भाव खाऊन गेला अन् फिल्म फेअरचा उत्कृष्ट विनोदी कलाकाराचा दुसर्‍यांदा पुरस्कारही मिळवून गेला.
‘‘जॉनी भाईच्या चेहर्‍यावर खास प्रकारचे मिश्किल भाव नेहमीच असत.ऽऽऽ हं....मियाँऽऽऽऽऽ असा खास हेल आणि चेहर्‍यावरचे मीच कसा सम्राट असे भाव काढत संवादाला उत्तर देण्याची एक खास अदा त्यांच्याकडे होती. गोंधळात पडलेला त्यांचा चेहरा खूप हसे आणि टाळ्या वसूल करून जाई. जॉनीभाईची बोलण्याची पण एक खास लकब होती. त्यांच्या आवाजावरून ते लगेच ओळखले जात. या सर्व वैशिष्ठ्यामुळे रफी साहेब पण त्यांच्यासाठी असा आवाज देत की जणू काही जॉनीभाई गात आहेत. त्यांच्यावर चित्रीत झालेली सर्व गाणी हिट झाली. विशेष म्हणजे जॉनी वॉकर स्वत:ही उत्तम गात असत. चित्रपट जरी कृष्ण धवल होते तरीही त्यांनी आपल्या अदाकारीने त्यात विविध रंग भरले.’’ शम्मी कपूर जॉनी वॉकरचे खास मित्र. अनेकदा तो त्याच्या घरी जाऊन गीता बालीला कसं पटवावे याच्या टिप्स मागत...आणि हा बहाद्दरही टीप्स देई...त्याची लोकप्रियता बघून 1957 मध्ये एका निर्माता दिग्दर्शकाने जॉनी वॉकर व श्यामा यांना मुख्य भूमिकेत घेऊन ‘‘जॉनी वॉकर’’ याच नावाचा चित्रपट काढला. अर्थात तो म्हणावा तितका चालला नाही. गुरूदत्तचा अकाली मृत्यू हा जॉनी वॉकरसाठी मोठा धक्का होता. सबंध आयुष्यभर जॉनी वॉकर आपल्या या मित्राला कधीच विसरू शकले नाही. गुरूदत्त गेल्यानंतर दिलीप कुमारने जॉनी वॉकरला खूप मोठा मानसिक आधार दिला. गुरूदत्तच्या प्रत्येक चित्रपटात त्याची महत्वाची भूमिका असे. त्याच्या ‘‘सीआयडी’’ या चित्रपटात मजरूहचे एक गाणे आहे...’’ ए दिल है मुश्कील है जिना यहाँ...जरा हटके जरा बचके....ये है बंबई मेरी जा’’. हा चित्रपट 1956 सालातला. या गाण्यात उल्लेख असलेली ट्राम आणि मील वगळता आजही मुंबईत सर्व काही तसेच आहे. बाकी सर्व गाणे आजही मुंबईला लागू पडते. यातील काही ओळी अशा आहेत-


‘‘बेघर को आवारा यहाँ कहते हँस-हँस,
खुद काटे गले सबके, कहे इसको बिजनस
इक चीज के है कई नाम यहाँ....जरा हट के....’’
अतिशय सुंदर अभिनयाने जॉनी वॉकरने या गाण्याला अजरामर केले..मग आजची मुंबई खरोखर किती बदलली आहे? आजही बेकारांचे तांडे मुंबईकडे जातच असतात. विस्थापिताची प्रक्रिया आजही सुरूच आहे.
जॉनी वॉकर हे अत्यंत नम्र आणि विनयशील. ते जेंव्हा ‘‘आर पार’’ याचित्रपटाची शुटींग करीत होते त्यावेळी या चित्रपटाची नायिका शकीलाची बहिण नूरजहाँ अनेकदा सेटवर येत असे. जॉनी वॉकर तिच्या प्रेमात पडले. पण तिच्या घरच्याकडून विरोध असल्यामुळे एक दिवस मग दोघांनी गुपचूप निकाह केला. बर्‍यापैकी पैसे हातात आल्यावर आगोदर बांद्रा व नंतर अंधेरीला घर घेतले व त्याचे नाव ‘‘नूर व्हीला’’ असे ठेवले. या दांपत्याला नाजिम, कासिम व नासिर हे तीन मुले तर कौसर, तसनिम, फिरदौस या तीन मुली आहेत. त्यांचा एक मुलगा नासिर ने अगोदर मॉडेलिंग केले आता तो अभिनेता आहे. बागवान, फोर्स-2, चॉक अन्ड डस्टर अशा चित्रपटात त्याने निगेटीव्ह भूमिका केल्या मात्र वडिलांसारख्या विनोदी भूमिका त्याला करायची इच्छा असूनही वाट्याला आल्या नाही.
1980 नंतर मात्र हळूहळू जॉनीभाईचे चित्रपटात दिसणे कमी कमी होत गेले. ‘‘शान’’ चित्रपटातील त्यांचा ‘‘चाचा’’ अमिताभ, शत्रूघ्न सिन्हा, परविन बाबी, नितू सिंग, शशी कपूर, बिंदीया गोस्वामी, सुनीलदत्त या तगड्या अभिनेत्यातही भाव खाऊन गेला. यातील त्याचं ‘‘नही...नही...’’ हे पालूपद मस्तच....!!!! या नंतर ते दिसले थेट चार वर्षानंतर ‘‘मेरा दोस्त मेरा दुश्मन’’ या 1984 च्या चित्रपटात. यातील डाकूच्या टोळीतील अक्कड दारूचा शौकिन मुलायम सिंग खासच होता. मग बर्‍याच मोठ्या कालखंडानंतर 1998 मध्ये कमल हसनच्या ‘‘चाची 420’’ मध्ये ते दिसले. यातला त्यांचा पियक्कड्ड मेकअपमन म्हणजे अर्क होता. मधल्या 13-14 वर्षात ते कॅमेर्‍यासमोर आलेच नव्हते. पण यातील 78 वर्षांच्या या विनोद वीराने धमाल केली या भूमिकेत कमल हसन या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चित्रपटासाठी जॉनी वॉकरची आठवण व्हावी यात सर्व आले.
त्यांनी जवळपास सर्वच लोकप्रिय अभिनेत्यासोबत काम केले. 1970 मध्ये आलेल्या ‘‘आनंद’’ मध्ये हृषिकेश मुखर्जींच्या आग्रहाखातर जॉनी वॉकरने एक छोटीशी पण लक्षणीय भूमिका केली. मला स्वत:ला ती खूप भावली. आनंद चित्रपटभर एका अनामिक मुरारीलालचा शोध घेत असतो. खरं तर त्याला माणसं जोडायची असतात, मुरारीलाल तर एक बहाणा असतो. पण एकदा अचानक त्याला त्याचा मुरारीलाल अर्थात जॉनी वॉकर सापडतो. मग दोघांत मस्त संवादाची देवाणघेवाण होते. जॉनी वॉकरचा हा मुरारीलाल अर्थात इसाभाई सुरतवाला एकदम झकासच.
आनंदच्या शेवटच्या क्षणी हा इसाभाई त्याला भेटायला येतो. हा प्रसंग जॉनी भाईने अप्रतिम साकार केला आहे....’’ मै वापस आऊंगा जयचंद...इतने जल्दी इस पर पर्दा नही गिरने दूंगा.... म्हणत बाहेर येतो आणि डॉ.भास्करला....‘‘ये शर्त रघूकाका जीत जाये....’’ म्हणत ढसाढसा रडणारा इसाभाई कमालीचा भाव खाऊन गेला. आयुष्यभर खळखळून हसविणार्‍या जॉनी भाईने या चित्रपटात रडविले. हृषिदाला त्यांची ही क्षमता नक्कीच माहित असावी....‘‘श्रीमंत मेहूणा’’ या मराठी चित्रपटातही त्यांनी एक भूमिका केली होती.


हा योगायोग नाही की जगभरातील सर्वच हास्य कलावंतांनी त्यांच्या खासगी आयुष्यात खूप काही सोसले. कष्टांचे डोंगर उपसले. आम्हाला मनमुराद हसवतांना त्यांच्या चेहर्‍यावर मात्र दु:खाची एक लकेरही उमटू दिली नाही. चित्रपटापासून दूर गेल्यावर जॉनी वॉकरनी रत्न व खड्यांचा व्यापार करायला सुरूवात केली. आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत जॉनी भाईने 300 च्यावर चित्रपटातून आम्हाला निखळ आनंद दिला. बसची तिकीटे फाडणार्‍या बस कंडक्टर बद्रुद्दीन जमालोद्दीन काजीने आपल्या कर्तृत्चसपे लोकांनाही स्वत:च्या चित्रपटाची तिकीटे फाडायला भाग पाडले यातच या अभिनेत्याचा सन्मान आहे...जगातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे लोकांच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटविणे. ज्यांना हे जमते ते कलावंत आणि माणूस म्हणूनही मोठेच होत. 29 जुलै 2003 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती जागवतानां प्रत्येकाच्या ओठी स्मितरेषा उमटावी ही इच्छा..... 

Advertisement

Advertisement