Advertisement

  राज्यात सध्या कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही : शरद पवार

प्रजापत्र | Thursday, 08/04/2021
बातमी शेअर करा

 महाराष्ट्रातील सध्याची कोरोना स्थिती आणि एकंदर घडामोडी पाहता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. राज्यात सध्याच्या घडीला आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी, डॉक्टर, नर्स या सर्वांचीच अहोरात्र मेहनत सुरु आहे. यातच कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनंही काही कठोर निर्बंध लागू केले आहेत. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारच्या 'ब्रेक दि चेन' या मोहिमेला सध्या राज्यभरातील विविध स्तरांतून विरोध होत आहे, पण याशिवाय संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी काही पर्याय नाही, ही बाब शरद पवार यांनी स्पष्ट केली. 

 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठीची नियमावली लागू करण्यासंदर्भात केंद्रही आग्रही असल्याचं ते यावेळी म्हणाले. आपण देशाच्या आरोग्य मंत्र्यांशी संपर्क साधला असून, राज्यात ज्या काही त्रुटी आहेत, त्यावरही काम करण्याबाबत चर्चा केली. ज्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केंद्र सरकार आणि केंद्राची यंत्रणा राज्यांच्या सोबत आणि महाराष्ट्रासोबत असल्याचं आश्वासन दिल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.

Advertisement

Advertisement