मुंबईः 'आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊन नको मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते,' असा टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.
राज्यात करोना संसर्गानं पुन्हा एकदा उचल खालली आहे. त्यामुळं पुन्हा करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. तर, एकीकडे पुन्हा लॉकडाऊन विरोधकांनी विरोध केला आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाऊनला विरोध केला होता. महिंद्रांच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.
'करोना ही अंधश्रद्धा वगैरे नसून महामारीचे संकट आहे. पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन काळात लोकांना थाळ्या व टाळ्या पिटायला लावलं. पण त्यामुळे करोना गेला नाही. करोनाचा संबंध कोणत्याही जाती-धर्माशी नाही. त्यामुळे घंटा बडवून, अजान देऊनही तो थांबणार नाही. आनंद महिंद्रा यांच्यासारख्या उद्योगपतीने महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे, पण पंतप्रधान मोदी यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊन मोहिमेत महिंद्रा सामील झाले होते व त्यांनी थाळ्या पिटण्याचा आनंदही साजरा केला होता. पण पुन्हा लॉकडाऊन नको ही त्यांची भावना चुकीची नाही,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.
'पहिल्या लॉकडाऊनला वर्ष झालं. २४ मार्च २०२० च्या संध्याकाळी पंतप्रधान मोदी यांनी अचानक संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केला. त्यानंतर जे घडत गेलं ते धक्कादायक आणि अमानुष होते. स्वातंत्र्यानंतरचं सगळ्यात मोठं पलायन हिंदुस्थाननं याच काळात पाहिलं. देशभरात लोक अडकून पडले. ऑटो, सायकल, बाईकने, पायी चालत असा प्रवास लोकांनी दोन-दोन हजार किलोमीटर केला. त्या प्रवासात अनेकांनी प्राण सोडले. पुढचे सहा-सात महिने लोकांनी घरातच कोंडून घेतलं. कमाईचं साधन बुडाले. रोजगार संपला, पण भीतीनं त्या सगळ्यांना घरात कोंडून ठेवलं. त्या भीतीची भिंत आता फुटली आहे. ती बांधता येणे कठीण आहे,' असं राऊत म्हणाले आहेत.
'महाराष्ट्रासह देशाची गती मंदावली असली तरी राजकारणाचा वेग जोरात आहे. तेथे कोरोनाचे भय अजिबात नाही. प. बंगालात विधान सभेचे तीन टप्पे पार पडले. हजारोंचे रोड शो, लाखोंच्या सभांत कोरोनाचा लवलेशही आढळला नाही. मथुरेत होळी साजरी झाली. त्यात लाखो लोकांनी भाग घेतला. 'लॉकडाऊन'चे दरवाजे देवाचिया द्वारी तुटून पडले, पण त्यामुळे करोना संपूर्ण खतम झाला असे घडले नाही,' अशी टीकाही त्यांनी केली