Advertisement

जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवासी इमारतींचे पालटणार रुपडे

प्रजापत्र | Friday, 02/04/2021
बातमी शेअर करा

मुंबई (दि. ०२) ---- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील विविध रखडलेली कामे व नाविन्यपूर्ण विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. ना. मुंडेंच्या मध्यानातून जिल्ह्यातील पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज अंबाजोगाई व परळी या पंचायत समित्यांच्या निवासी इमारतींचे रुपडे पालटणार असून, सभापती, अधिकारी-कर्मचारी तसेच निवासी इमारतींच्या बांधकाम व उपकामांसाठी २ कोटी ८५ लाख रुपये निधी ग्रामविकास विभागामार्फत मंजूर करून जिल्हा प्रशासनास वितरित करण्यात आला आहे. 

 

 

सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पातून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवासी इमारतींच्या बांधकामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीमधून सदर कामांना मंजुरी देण्यात आली असुन, सदर निधी वितरणाचा शासन आदेश बीड जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला आहे. 

 

 

यांतर्गत पाटोदा पंचायत समितीस रू. ४५ लाख, गेवराई पंचायत समितीस रू. ७० लाख, केज पंचायत समितीस ५० लाख, अंबाजोगाई पंचायत समितीस ३० लाख तर परळी व माजलगाव पंचायत समितीस प्रत्येकी ४५ लाख रुपये सभापती, अधिकारी- कर्मचारी निवासस्थाने बांधकाम व उपकामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी २६ जानेवारी २०२१ रोजी बीड जिल्हा वासीयांना उद्देशून केलेल्या भाषणातून कोविड विषयीचे आर्थिक निर्बंध जसजसे कमी होतील तसतसे जिल्ह्यातील रखडलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यासह, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक कामे हाती घेतली जातील असे आश्वासन जिल्हा वासीयांना दिले होते. 

 

 

त्यानुसार धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील रुग्णालये, न्यायालये आदी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानंतर आता जिल्ह्यातील ६ पंचायत समित्यांच्या निवासी इमारतींच्या बांधकामांसाठी २ कोटी ८५ लाख रुपये निधी प्राप्त झाल्याने या इमारतींचे रुपडे आता पालटणार आहे.

Advertisement

Advertisement