मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारपणाबद्दल सोशल मीडियातून विकृत व आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं या संदर्भात मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडं तक्रार केली असून आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पोटदुखीचा त्रास झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या शरद पवार यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. एन्डोस्कोपी शस्त्रक्रियेद्वारे पवारांच्या पित्ताशयातील खडे काढून टाकण्यात आले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पवारांच्या आजारपणाच्या बातमीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या चाहत्यांमध्येही चिंतेचं वातावरण होतं. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पवारांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मात्र, त्याचवेळी काही लोकांनी सोशल मीडियावर विकृत पोस्ट टाकल्या होत्या. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांनी मुंबई पोलिसांकडं या संदर्भात तक्रार केली आहे. शेख यांनी सायबर क्राईमचे एसपी शिंत्रे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सूरज चव्हाण व इतर युवक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. 'आमचा मान, स्वाभिमान असलेल्या साहेबांवर केलेली टीका जिव्हारी लागणारी आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून या समाजकंटकांवर कारवाई करावी,' अशी मागणी शेख यांनी केली. त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम १५३ अ, ५०५(२), ५००,५०४,४६९,४९९,५०७,३५, IT act ६६ (D) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.