राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पोटदुखीच्या तक्रारीनंतर त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे मंगळवारी रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.
सोमवारी शरद पवारांना गॉल ब्लँडरचा त्रास होत होता. त्यावेळी पवारांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तसेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र जास्त त्रास जाणवत असल्यामुळे मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पित्ताशयातील खडा यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला असून पवारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.
ही शस्त्रक्रिया होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार हे नेते रुग्णालयात उपस्थित होते. पवारांवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत.