बीड : कोरोनाच्या वर्षपूर्तीनंतरही कोरोनाशी लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे याचे भीषण वास्तव सध्या अंबाजोगाईच्या 'स्वाराती' ग्रामीण रुग्णालयात पाहायला मिळू शकते. कोरोनाचा जिल्ह्यातील सर्वाधिक मृत्युदर असलेल्या या रुग्णालयातील कोरोनासाठी म्हणून राखून ठेवलेल्या ५६ पैकी थोडेथोडके नव्हे तर चक्क २७ व्हेंटिलेटर बंद असून ते रुग्णांना वापरण्यासारखे नसल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय महाविद्यालयासारख्या संस्थेतील कोरोना साथीचे निम्मे व्हेंटिलेटर बंद असतील तर आरोग्य प्रशासन कोरोनाबाबतीत किती गंभीर आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे तसाच मृत्युदर देखील वाढत आहे . अशावेळी कोरोनाशी लढणारी व्यवस्था सज्ज ठेवण्याचे आव्हान जिल्ह्याला वर्षभरानंतरही पेलता येत नसल्याचे चित्र आहे. राज्यभरात सध्या ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश दिले जात आहेत, मात्र बीड जिल्ह्यातील 'हायर सेंटर ' म्हणवल्या जाणाऱ्या 'स्वाराती ' ग्रामीण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोनासाठी म्हणून राखून ठेवलेले व्हेन्टिलेटरच बंद असल्याचे समोर आले आहे.
या रुग्णालयाकडे एकूण ७६ व्हेंटिलेटर आहेत. त्यातील ५६ कोरोनावरील उपचारासाठी म्हणून राखून ठेवण्यात आले होते. मात्र या ५६ पैकी तब्बल २७ व्हेंटिलेटर बंद असल्याचे समोर आले आहे.यावर आता रुग्णालयाच्या अभ्यागत मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली असून त्यानंतर मार्च एंडच्या मुहूर्तावर त्यासाठी नियोजन समितीच्या निधी मागणी करण्यात आली आहे.
'स्वाराती' ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हे आशिया खंडातील मोठ्या ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक मानले जाते, अशा संस्थेत जर परिस्थिती ही असेल तर कोरोनाशी लढण्यासाठी सरकार खरोखरच किती गंभीर आहे हा प्रश्न निर्माण होत आहे.
----
पीएम केअरमधील व्हेन्टिलेटरही बिघडले
कोरोना संसर्ग वाढू लागल्यानंतर राज्यातील अनेक रुग्णालयांना पीएम केअर मधून व्हेन्टिलेटरचा पुरवठा करण्यात आला होता. बीडमध्ये जिल्हा रुग्णालय आणि अंबाजोगाईच्या 'स्वाराती ' रुग्णालयाला असे व्हेंटिलेटर देण्यात आले होते. याला अजून एक वर्षही झालेले नाही, मात्र इतक्यातच स्वाराती रुग्णालयातील पीएम केअरमधील तब्बल १० व्हेंटिलेटर बिघडले असल्याची माहिती आहे .
---
प्रजापत्र | Wednesday, 31/03/2021
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा