Advertisement

वाळूचे ट्रॅक्टर, जेसीबी कसा अडवतोस असे म्हणत दोघा भावावर काठीने, रॉडने हल्ला

प्रजापत्र | Tuesday, 30/03/2021
बातमी शेअर करा

प्रतिनिधी / केज 
वाळूचे ट्रॅक्टर आणि जेसीबी कसा अडवतोस असे कारण काढून तिघांनी दोघा भावावर काठीने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या मारहाणीत एकाचा हात फॅक्चर झाला असून डोके ही फुटले आहे. ही घटना केज तालुक्यातील कापरेवाडी शिवारात घडली. याप्रकरणी केज पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

         कापरेवाडी येथील सोमनाथ जनार्दन कापरे यांच्या शेतातील जुन्या घरासमोरील कच्या रस्त्यावरून वाळूचे ट्रॅक्टर भरून जात असल्याने खड्डे पडून रस्ता खराब होतो. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्याने वागणे कठीण होते. अशी रस्त्याची वाईट अवस्था होत असल्याने त्यांचा भाऊ अण्णासाहेब कापरे हे अगोदर रस्ता व्यवस्थित करून त्यावरून वाहतूक करा असे म्हणत वाळूचे ट्रॅक्टर नेण्यास विरोध करीत होते. याचा राग मनात धरून आरोपी अतुल अंकुशराव देशमुख, रविंद्र भोसले ( दोघे रा. वरपगाव ), जेसीबी चालक हरी ( अतुल देशमुखचा पाहुणा ) या तिघांनी २९ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास कापरेवाडी शिवारात पिंपरी फाट्याजवळील हॉटेल गारवा समोरील रस्त्यावर अण्णासाहेब कापरे यांना अडवून आम्हाला दारू पाज असे म्हणत शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करू लागले. भावाला मारहाण होत असल्याने मदतीसाठी सोमनाथ कापरे धावून आले. यावेळी जेसीबी चालक हरी याने काठीने मारहाण करीत सोमनाथ यांचा हात फॅक्चर केला. तर रवींद्र भोसले याने लोखंडी रॉडने मारहाण करीत सोमनाथ यांचे डोके फोडले. तर अतुल देशमुख याने लाथाबुक्याने मारहाण केली. या मारहाणीत अण्णासाहेब यांच्या ही कपाळावर आणि मानावर मार लागला आहे. आता वाळूचे ट्रॅक्टर आणि जेसीबी कसा अडवतोस असे म्हणत त्यांनी जीवे मारण्याची धमकी ही दिली. गंभीर जखमी झालेले सोमनाथ कापरे यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोचार करून अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. उपचारानंतर सोमनाथ कापरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतुल देशमुख, रविंद्र भोसले, जेसीबी चालक हरी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करत आहेत. 

Advertisement

Advertisement