Advertisement

विहिरीत बुडून मुलाचा मृत्यु

प्रजापत्र | Monday, 29/03/2021
बातमी शेअर करा

केज दि.२९ – आजोबांकडे राहत असलेल्या ११ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यातील गोटेगाव येथे रविवारी रात्री उघडकीस आली. विहिरीतील पाणी उपसून काढून मृतदेह बाहेर काढण्यात आला. अजय सतीश चौधरी ( वय ११, रा. पैठण ता. केज ) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे.
        पैठण ( सावळेश्वर ) येथील अजय सतीश चौधरी ( वय ११ ) हा आजोळी गोटेगाव येथे कालिदास बोराडे या आजोबांकडे राहत होता. रविवारी दुपारी अजय चौधरी हा खेळत खेळत आजोबांच्या माळाचे शेत नावाच्या शेतात विहिरीत पडला. विहिरीत पाणी भरपूर असल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. अजय विहिरीत पडल्याचे कोणाला माहीत नसल्याने त्याचा सुरुवातीला इतरत्र शोध घेतला. त्यानंतर विहिरीत पडल्याचा संशय आल्याने रात्री ११ वाजेपर्यंत विहिरीतील पाणी उपसून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच युसुफवडगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे, बिट जमादार अंगद पिंपळे, पोलीस नाईक श्यामराव खनपटे यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अजयच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. आजोबा कालिदास बोराडे यांच्या खबरेवरून युसुफवडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक अंगद पिंपळे हे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Advertisement