नवी दिल्ली - गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा चर्चा झाली असून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेले पाहायला मिळत आहे. याच दरम्यान शनिवारी (२७ मार्च) पंजाबमधील मलोट शहरात पत्रकार परिषद घेणाऱ्या भाजपा आमदारालाही शेतकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांनी भाजपा आमदार अरुण नारंग यांना बेदम मारहाण करत त्यांचे कपडे फाडले आणि नंतर तोंडाला काळं फासल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपा आमदार अरुण नारंग राज्य सरकार विरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी शनिवारी मलोट येथे आले होते. मात्र ते येण्याच्या आधीपासूनच संतप्त शेतकरी भाजपा कार्यालयात त्यांची वाट पाहत होते. नारंग आपल्या कारने या ठिकाणी पोहचताच शेतकऱ्यांनी त्यांच्याभोवती गर्दी केली आणि त्यांच्यावर शाई फेकली. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या कारलाही काळं फासलं आहे. अखेर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांच्या गर्दीतून बाहेर काढलं. अरुण नारंग पंजाबमधील अबोहरमधून भाजपा आमदार आहेत.
संतप्त शेतकऱ्यांनी भाजपा कार्यालयातील भाजपाचे झेंडेही जाळलेभाजपा आमदाराच्या अंगावर शाई फेकल्यानंतर पोलीस आणि भाजपा कार्यकर्ता नारंग यांना एका दुकानात घेऊन गेले. मात्र नंतर आमदार नारंग दुकानाबाहेर आल्यावर शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शेतकऱ्यांनी या आमदाराचे कपडे देखील फाडले. सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ देखील जोरदार व्हायरल होत आहे. यात पोलीस नारंग यांचा शेतकऱ्यांपासून बचाव करताना दिसत आहे. या व्हिडीओत शेतकरी आमदाराला शिव्या देताना आणि मारहाण करतानाही दिसत आहेत. याशिवाय या संतप्त शेतकऱ्यांनी भाजपा कार्यालयातील भाजपाचे झेंडेही जाळले.