जळगाव- राज्यात सध्या वीज बिल न भरलेल्या लोकांचे कनेक्शन तोडण्याचे अभियान सुरू आहे. सरकारच्या या निर्णयाचा भाजप आणि मनसेकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. जळगावात शुक्रवारी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या समर्थकांसह वीज विभागाच्या कार्यालयात घुसून तोडफोड करत गोंधळ घातला. दरम्यान त्यांनी महावितरणच्या एका अधिकाऱ्याला बराच वेळ खुर्चीवर बांधून ठेवले. शनिवारी चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अद्यापही कुणाला अटक झालेली नाही.
कुणी त्यांना सोडवू नये म्हणून कार्यालयाला कुलूप लावले
ही घटना जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील आहे. शुक्रवारी मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्त्वात जळगावात वीज कंपनीच्या कार्यालयात एक आंदोलन केले. यामध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त लोकांचा समावेश होता. संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी वीज वितरण कंपनीचे अधिकारी मोहम्मद शेख यांना त्यांच्या खुर्चीला अनेक तास बांधून ठेवले. एवढेच नाही तर त्यांना कुणी सोडवू नये म्हणून त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर कुलूप लावण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला. यामध्ये आमदार आणि समर्थक कार्यालयात गोंधळ घालताना आणि घोषणाबाजी करताना दिसत आहेत.
बांधून ठेवण्याविषयी मंगेश चव्हाण म्हणतात...
अधिकाऱ्याला बांधून ठेवल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वीकार केले आहे. ते म्हणाले की, चाळीसगाव तालुक्यात 7,000 शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहेत. शेतकरी वीज बिल भरण्यास तयार आहेत, तरीही अधिकारी त्यांना स्पष्ट उत्तर देत नाहीत. यामुळे नाराज शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना खुर्चीला बांधून ठेवले. यावेळी त्यांनी इशाराही दिला की, जर सरकारने याकडे योग्य वेळी लक्ष दिले नाही, तर मंत्र्यांनाही खुर्चीला बांधून ठेवण्यात येईल.