देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणाऱ्या वाढीदरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. 1 एप्रिलपासून 45 आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्र सरकारने मंगळवारी हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 45 ते 60 वर्षांमधील गंभीर आजारी व्यक्तींनाच लस दिली जात होती.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले की, देशात कोरोना लसीची कमतरता नाही. लस घेण्यासाठी फक्त रजिस्ट्रेशन करावे लागेल आणि त्यांना सरकारी किंवा खासगी केंद्रांवर लस दिली जाईल.
आतापर्यंत 4.85 कोटी डोस दिले
जावडेकर पुढे म्हणाले की, आतापर्यंत देशात 4.85 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. यातील 80 लाख कोटी लोकांना दोन्ही डोस दिले आहेत. मागील 24 तासात सर्वाधिक 32.54 लाख डोस देण्यात आले आहेत.
देशात आज सक्रिय रुग्णांची संख्या 3.50 लाखांवर जाण्याची शक्यता
देशात कोरोना संक्रमनामुळे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज देशात नवीन रुग्णांची संख्या ही 40,611 आढळली असून यात 29,735 उपचार घेत बरे झाले आहेत. तर 197 लोकांचा मृत्यू झाला आहे. काल रविवारी देशामध्ये 47,009 नवीन रुग्ण आढळून आले होते. गेल्या आठवड्यामध्ये पहिल्यांदा नवीन रुग्णांच्या संख्येत एवढी घट पाहायला मिळाली आहे. यापूर्वी 14 मार्चला 26,413 रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यामध्ये सतत वाढ होत गेली.