मुंबई: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य दिल्याच्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपांचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. या लेटरबॉम्बवरुन भाजपनं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरलं आहे. तसंच, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सरकारवर दबावही आणला जात असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून डॅमेज कंट्रोलसाठी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच हे बदल होणार असल्याची चर्चा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यांकडून गृहखात काढून दुसरं खातं सोपवलं जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख अशा एक नव्हे तर दोन मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना अभय दिले. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर कोणतीही चौकशी होण्याआधीच त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपदावरून दूर हटविले. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये तसेच आमदारांमध्ये आता उघड नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळंच हे फेरबदल होत आहेत का अशी चर्चा आहे.