बीड दि.२२ - मागच्या एक वर्षांपासून कोरोनाच्या प्रकोपमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असली तरी शिक्षणाची म्हणावी तेवढी सोय झालेली नाही. मात्र असे जरी असले तरी शिक्षण विभागाच्या वतीने वेगवेगळे प्रयोग राबवल्या जात आहेत. आणि याचाच एक भाग म्हणून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे.
महत्वाच्या टप्पा असणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने प्रश्नसंच प्रकाशित केले आहेत. परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, याची कल्पना विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.परीक्षा अवघ्या एक महिन्यावर आली आहे. उत्तरे शोधताना विद्यार्थ्यांची तारांबळ उडू नये म्हणून क्विल नावाच्या ऍप्लिकेशनची मदत होणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) ने हा उपक्रम राबवला आहे. महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना याबाबत मदत करण्याच्या उद्देशाने मुंबई स्थित टार्गेट प्रकाशनाने या प्रश्नपेढीतील प्रश्नांची उत्तरे तयार केली असून ती प्रकाशनाच्या 'Quill - The Padhai App' या ॲपवर अपलोड करण्यात आली आहेत. सदरील ऍप हे प्ले स्टोर वर उपलब्ध आहे. ॲपच्या माध्यामातून दहावी व बारावीचे सर्व विद्यार्थी व शिक्षक या प्रश्न पेढीतील प्रश्नांची उत्तरे कोणत्याही शुल्काविना मोफत मिळवू शकतात. मुंबईतील महानगर पालिकेच्या सर्व शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांना हे ॲप मोफत देण्यात येत आहे.