मुंबई:परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप ही देशाच्या इतिहासातील पहिलीच घटना असेल. परमबीर सिंह यांना पदावर नियुक्त होऊन एक वर्षेच झाले असेल त्यानुसार त्यांनी १२०० कोटी द्यायला हवे असेल. पण लॉकडाऊनमुळे बार बंद होते. त्यामुळे ही वसुली झाली नसेल. राज्यात शहरं किती पोलीस कमिशनर किती त्यांना काय टार्गेट दिलं हे अजून बाहेर आलं नाही. गृहमंत्र्यांची कसून चौकशी होणं गरजेचं आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून भाजपपाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसंच, या प्रकरणात केंद्रान हस्तक्षेप करुन तपास करावा असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. केंद्रानं योग्य चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल, असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं आहे.
'बॉम्ब अतिरेकी ठेवतात हे ऐकलं होतं, पण पोलीस बॉम्ब ठेवतात हे ऐकलं नव्हतं किंवा पाहिलं नव्हतं. मुळात परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली? मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं?,' अशी शंका राज ठाकरेंनी उपस्थित केली आहे.
'सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, मग फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे मागे लागले होते, हेच वाझे शिवसेनेत होते आणि मुकेश अंबानी आधी उद्धव ठाकरे हे घनिष्ट मित्र आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला मुकेश अंबानी सहपरिवार उपस्थित होते. आणि त्यांच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि ती गाडी पोलिसांनी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कोणीतरी वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकतं का? ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली म्हणूनच या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण याची चौकशी महाराष्ट्रात होणार नाही आणि जशी चौकशी योग्य प्रकारे झाल्यास फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल', असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं आहे.