बीड : राज्यातील कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रमाणामुळे राज्य सरकारने नव्याने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानूसार राज्यभरातील सिनेमा हॉल, हॉटेल 50 टक्के क्षमतेनेच चालविता येतील असे निर्देश देण्यात आले आहेत. त्या सोबतच शॉपिंग मॉल मध्ये देखील कोरोना नियमांचे पालन सक्तीचे करण्यात आले आहे. तर शासकीय कायालये 50 टक्के उपस्थितीत चालविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात कोरोना संसर्गाचे आकडे वाढत असल्याने राज्य सरकारने 31 मार्चपर्यंत राज्यभरात नव्याने निर्बंध लागू केले आहेत. यामुळे आता राज्यभरातील सिनेमागृह, हॉटेल, रेस्टॉरंट केवळ 50 टक्के क्षमतेने चालविता येणार आहेत. या ठिकाणी मास्क शिवाय कोणालाही प्रवेश देऊ नये असे स्पष्ट निेर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय कायालये 50 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीत चालविण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले आहेत.
लग्नाला 50 तर अंत्यविधीला 20 लोकांची परवानगी
31 मार्चपर्यंत राज्यात विवाह सोहळ्यासाठी केवळ 50 व्यक्तींना तर अंत्यविधीसाठी केवळ 20 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. त्यापेक्षा अधिकची उपस्थिती आढळल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.
राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी
आजपासून 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचे मेळावे, सभा यात्रा, आंदोलन, मोर्चे या काळात काढता येणार नाहीत.
होम आयसोलेशनला परवानगी
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे लक्षणे नसलेल्या व्यक्तींना होम आयसोलेशन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बाबत स्थानिक अधिकार्यांना मंजूरीचे अधिकार देण्यात आले आहे. होम आयसोलेशन मंजूर करण्यात आलेल्या रुग्णाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे.