पुणे: वाजले की बारा गाण्याने राज्यातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या बारामती तालुक्यातील गुनवडी गावच्या बाबजी कांबळे या रिक्षा चालकास आता मराठी चित्रपटाची ऑफर आली आहे. ‘चल रे फौजी’ आणि ‘कवच’ या आगामी दोन चित्रपटांमध्ये बाबजी कांबळे हे अभिनय करणार आहेत. आज चित्रपट-दिग्दर्शक घनशाम येडे यांनी बारामतीत येऊन बाबजी कांबळे यांची भेट घेऊन त्यांना चित्रपटाची ऑफर दिली.
बाबजी कांबळे यांची ही लावणी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले आहे. गॅस पॉइंट सेंटरवर बराच वेळ लागणार असल्याने मोकळ्या वेळेत काय करायचे असा प्रश्न समोर आला. तेव्हा इतर रिक्षाचालकांनी त्यांना गाण्यावर डान्स करण्याची सुचना केली आणि वाजले की बारा या गाण्यावर अप्रतिम नृत्य कांबळे यांनी केले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याची माध्यमातूनही दखल घेतली गेली. त्यानंतर आज अलख निरंजन’, ‘एलिजाबेथ एकादशी’ अशा काही चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक असलेल्या घनश्याम येडे यांनी बाबजी कांबळे यांची भेट घेत त्यांना आगामी दोन चित्रपटात काम करण्यासंदर्भात करारही केला, असं घनशाम येडे यांनी सांगितले.
बाबजी कांबळे यांची प्रतिक्रिया
व्हायरल व्हिडीओनंतर थेट चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यानं बाबजी कांबळे यांनीही आनंद व्यक्त केलाय. आपण नक्कीच चांगलं काम करुन दाखवू असंही त्यांनी सांगितलंय.
कसा झाला व्हिडीओ व्हायरल..?
दोन दिवसांपूर्वी बाबा कांबळे हे अन्य सहकाऱ्यांसमवेत बारामतीत माळेगाव रस्त्यावरील पंपावर आपल्या रिक्षात गॅस भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी वीज नसल्यानं तीन तास थांबावं लागेल असं सांगण्यात आलं. तीन तास काय करायचं असा विचार सुरु असतानाच बाबा कांबळे यांनी एका लावणीवर नृत्य सुरु केलं.. त्यांचं हे नृत्य पाहून त्यांचे रिक्षाचालक सहकारीही तिथे आले. रस्त्यावरुन येजा करणाऱ्या नागरीकांनाही हे नृत्य पाहण्याचा मोह आवरला नाही. त्यातच काहींनी त्यांचं हे नृत्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं.. आणि बघता बघता हा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला..