कोरोनाच्या भीतीने एक वर्ष वाया गेले, कोरोनामुळे जितके बळी गेले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोक या वर्षभरात देशोधडीला लागले आहेत. अक्षरशः लाखो कुटूंब उध्दवस्त झाली आहेत. आता कोठे कोरोना नंतरचा गाडा सुरळीत होईल असे वाटत असतानाच राज्यात कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. कोरोनाचे वाढणारे आकडे चिंता वाढविणारे आहेत. कोरोना नियंत्रणासाठी सरकारच्या पातळीवर 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी ' आणि 'मी जबाबदार' असे अभियान हाती घेतले गेले, मात्र आजही मोठ्याप्रमाणावर जनतेकडे पाहिल्यावर 'मी जबाबदार ' चा अर्थ सामान्यांना कळला आहे असे वाटत नाही. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ज्या काही सध्या सध्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्याचे पालन होताना दिसत नाही. आजही मास्क वापरायचा तो आपल्या स्वास्थ्यासाठी याची जाणीवच जनतेला नाही, म्हणूनच अनेक जण मास्क वापरतच नाहीत, कोणी वापरला तर समोरच्याला दाखवायला वापरला जातो, शारीरिक अंतराचे नियम, गर्दीचे नियम सर्रास पायदळी तुडविले जात आहेत , आणि मग सरकारकडून जनता नियम पाळणार नसेल लॉकडाऊन लावावा लागेल अशी भूमिका घेतली जात आहे. कोरोना नियंत्रण कोणा एकाची जबाबदारी नाही, तर त्याला जनतेने आणि सरकारने सामुहिकपणे सामोरे जायचे आहे. मात्र जनता नियम पाळत नाही म्हणून लगेच लॉकडाऊन हाच पर्याय मानणे देखील चुकीचे आहे. कोरोनाचा धोका नाही असे आम्हाला म्हणायचे नाही, मात्र सरकार आणि प्रशासनाने डोळसपणे विचार करायचा असतो. कोरोनाच काय कोणतीच महामारी लगेच संपत नसते, त्यामुळे कोरोना हा लगेच संपणार नाही, कोरोनाचा उद्रेक पुढचा काही काळ, काही वर्ष सातत्याने होत राहणार आहे. आतापर्यंतच्या सर्वच महामाऱ्यांचा हा इतिहास आहे, आणि कोरोनाबाबतही तज्ञ हेच सांगत आहेत. मग जर कोरोना पाठ सोडणारच नसेल तर त्याचं अस्तित्व मान्य करुनच जगायचं हे ठरवावे लागेल. कोरोनाच काय, कशामुळेच जगणं थांबविता येत नसतं.कोरोना कधी संपेल हे माहित नाही, कोणीच खात्रीपूर्वक याबद्दल बोलू शकत नाही, अशावेळी बंदीच्या आणि लॉकडाऊनच्या सावटाखाली किती दिवस राहायचे?
कोरोनाचे कारण दाखवत आता राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी देखील ही परिक्षा अशीच पुढे ढकलण्यात आली होती. अगोदरच मागच्या वर्षभरात शिक्षण क्षेत्राचीपुरती वाट लागली आहे. वर्ग भरण्याचा गोंधळ, परिक्षांचा गोंधळ, सामान्यांना न परवडणारे आणि अनेकांच्या पचनी न पडलेले आँनलाईनचे चोचले यात शिक्षणक्षेत्र भरडले गेले आहे. आणि अजूनही सरकारला बंदी हाच कोरोनावरचा उपाय वाटत असेल तर ते देशासाठी, राज्यासाठी खूप नवीन समस्या निर्माण करणारे ठरेल
लॉकडाऊन हा कोरोनावरचा उपाय नाही असे सारेच सांगतात, हा मार्ग केवळ पायाभूत सुविधांसाठी वेळ मिळावा म्हणून होता, मग आता वर्षभरानंतरही हाच मार्ग वापरण्याची लहर का येत आहे? परिक्षा रद्द करायच्या, भरती होऊ द्यायची नाही, उद्योग बंद करायचे तर मग सामान्यांनी जगायचे कसे? आठवडी बाजार बंद करण्याचा एक निर्णय झाला तर शेतीमालाचे भाव पडले, असाच लहरीपणा सुरुच राहिला तर सामान्यांचे जगणं अवघड होईल.परीक्षा रद्द केल्याने, बाजारहाट बंद केल्याने कोरोना आटोक्यात येईल हा निव्वळ भ्रम आहे. प्रशासन ज्यावेळी १० रुग्ण शोधत असते, तेंव्हा समाजात त्याच्या कितीतरी पट रुग्ण फिरत असतात. ज्यावेळी राज्याची पाँझिटिव्हीटी १०% असते त्यावेळी सेरोसर्व्हेचा अहवाल २५% व्यक्ती बाधित होऊन गेल्याचे सांगत असतो हे लक्षात घेतले पाहिजे. आता पुन्हा मुख्यमंत्री एकीकडे बंदचे इशारे देत आहेत, परिक्षा रद्द केल्या जात आहेत, त्याचवेळी लोकप्रतिनिधी कोरोनाचे कारण सांगून बंद करुन भागणार नाही, कोरोनासह जगावे लागेल असे म्हणत आहेत, हाच तरुणाईचा आणि सामान्यांचा सूर आहे. मायबाप सरकारने याचा विचार करावा. लोकांना कोरोना प्रतिबंधक उपायांची सक्ती कराच, पण कोरोना चार आठ दिवसात किंवा महिन्यात संपणारा नाही, याचे भान ठेवून त्याला बंदच्या ढालीआड न लपता पायाभूत सुविधा अधिक सक्षम करुन जागृती व जागरुकता निर्माण करुन कोरोनासह जगण्याची भूमिकाच घ्यावी लागणार आहे.
बातमी शेअर करा