Advertisement

आपण जबाबदरीपूर्वक वागल्यास कोरोना पुन्हा आटोक्यात येईल-धनंजय मुंडे

प्रजापत्र | Wednesday, 10/03/2021
बातमी शेअर करा

मुंबई-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे आकडे वाढत असताना जिल्हा प्रशासनाने गांभीर्यपूर्वक निर्णय घेतले आहेत. सर्व नागरिकांनी जबाबदरीपूर्वक नियमांचे पालन केल्यास प्रभू वैद्यनाथ कृपेने कोरोना पुन्हा आटोक्यात आणता येईल, यासाठी सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. 
धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा मंदिरातील प्रवेश बंद केले असून यात्रांवर देखील बंदी घातली आहे. 
परळी हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या वास्तव्याने पावन झालेले शहर आहे. दरवर्षी येथे महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते. त्याचबरोबर नगर परिषदेच्या वतीने शिवरात्री महोत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी प्राप्त परिस्थितीमुळे यात्रा महोत्सवाचे आयोजन रद्द करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील अन्य शिवालयांमध्ये देखील यात्रा भरणार नाहीत. मागील काही महिन्यात सर्व धर्माच्या विविध सण-उत्सवांवर कोरोनामुळे निर्बंध लागले आहेत. परंतु बीड जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संयमाने या परिस्थितीचा सामना करत  घरच्या घरी विविध सण-उत्सव साजरे केले. याबद्दल जिल्हा वासीयांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, असेही ना. मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement