Advertisement

म्हणून विधानसभा अध्यक्षपदाची निवड या अधिवेशनात टळली!

प्रजापत्र | Tuesday, 09/03/2021
बातमी शेअर करा

 मुंबई : नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यावर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवड या अधिवेशनात टळली आहे. कोरोनाबाधित आमदार आणि अर्थसंकल्प मंजूर करुन घेणे यात अध्यक्षपदाची निवडणूक या अधिवेशनात टळली आहे.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष झाले. पण काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.त्यामुळे या पदाची निवडणूक कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक मंत्री आणि आमदार कोरोनाबाधित असल्याने अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकली नाही.
आणि शेवटच्या तीन दिवसात अर्थसंकल्पात एक दिवस गेला. त्यातही विधी मंडळातील पंधराहून अधिक सदस्य कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयार नव्हते.
कॅबिनेट बैठकीतही याबाबत चर्चा झाली. काँग्रेस आग्रही असली तरी कोरोनाबाधित सदस्य आणि अर्थसंकल्प मंजूर करुन घेणे हे सरकारचे प्राधान्य असल्याने अखेरीस या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टळली आहे.
आता या अध्यक्षपदासाठी विशेष अधिवेशन भरवावे लागेल आणि त्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. हे पद काँगेसकडे असल्याने ही निवडणूक लवकरात लवकर व्हावी ही भूमिका काँगेसची आहे.

सध्या या पदासाठी काँग्रेसमधून संग्राम थोपटे आणि अमीन पटेल यांच्या नावाची चर्चा आहे पण अजूनही याबाबत अजून नाव निश्चित झालेली नाहीत. अध्यक्षपदाची निवडणूक लागल्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी नाव ठरवतील असं ही काँग्रेसच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

 

Advertisement

Advertisement