अहमदनगर: नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतील बोगस कर्ज प्रकरणाच्या तपासाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आणि नगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांची एंट्री झाली आहे. नगरला असताना धडाकेबाज कामगिरी करीत त्यांनी कथित गुंड आणि राजकारण्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्यातील आरोपी बँकेचे पदाधिकारी आणि संचालकांचे धाबे दणाणले आहेत.
कृष्णप्रकाश यांचा तापास एकाच गुन्ह्यापुरता राहणार की त्यानिमित्ताने बँकेतील गैरप्रकारची नगर पोलिसांकडूनही दुर्लक्षित राहिलेले प्रकरणेही ते बाहेर काढणार, याची चर्चा नगरमध्ये आहे. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील या गुन्ह्याचा तपास सुरू असून त्यांचेही नाव यामध्ये पुढे आल्याने त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. काल या गुन्ह्यात आणखी दोघांना अटक झाली असून त्यातील एक जण गांधी यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते.
बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली आल्याचा आरोप आहे. बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आली होती. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या काळात हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कर्ज घेणाऱ्या यज्ञेश बबन चव्हाण (रा. चिंचवड) व तत्कालीन संचालक नवनीत शांतिलाल सुरपुरिया (नगर) यांना पोलिसांनी प्रथम अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशुतोष लांडगे (नगर) व जयदीप वानखेडे (पुणे) या दोघांना अटक करण्यात आली. यातील एका कर्जप्रकरणातील ११ कोटी रुपये लांडगे याच्या खात्यावर वर्ग झालेले होते. पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मात्र, ही कर्ज मंजूर करण्यामध्ये सहभाग असलेले बँकेच पदाधिकारी, संचालक, कर्ज उपसमितीचे सदस्य यांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे.