Advertisement

 धक्कादायक! गेल्या १० महिन्यांत १० हजार कंपन्या बंद; महाराष्ट्रातील आकडा किती? वाचा

प्रजापत्र | Tuesday, 09/03/2021
बातमी शेअर करा

नवी दिल्ली-सन २०२० वर्ष कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे एकूणच जगासाठी अतिशय कठीण केले. भारतातही त्याचे दूरगामी परिणाम पाहायला मिळाले. कोरोना संकटामुळे 'न भूतो' असा लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे अनेक रोजगारांवर गदा आली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एक आकडेवारी जारी करण्यात आली. लोकसभेत विचारलेल्या एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाने आकडेवारी जारी करत गेल्या १० महिन्यांत १० हजार कंपन्या बंद झाल्याची माहिती दिली आहे.

मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या गेल्या १० महिन्यांच्या कालावधीत देशातील तब्बल १० हजार ११३ कंपन्या बंद झाल्या. कोणतीही दंडात्मक कारवाई न करता स्वइच्छेने बंद झालेल्या कंपन्यांची ही आकेडवारी असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.  लॉकडाउनमुळे देशातील आर्थिक व्यवहारांना खूप मोठा फटका बसला. त्यामुळेच या हजारो कंपन्या बंद करण्यात आल्या, असे सांगितले जात आहे. 

 

महाराष्ट्रात किती कंपन्या बंद?

लोकसभेमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना कंपनी व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी सांगितले की, ज्या कंपन्या आपल्या व्यवसायामधून बाहेर पडल्या आहेत त्यांची आकडेवारी मंत्रालयाकडे उपलब्ध नसते. मंत्रालयाने कंपन्यांविरोधात कारवाई केल्याने त्या बंद करण्यात आलेल्या नाहीत, असे राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दिल्लीमध्ये सर्वाधिक म्हणजेच २ हजार ३९४ कंपन्या, यानंतर उत्तर प्रदेशमध्ये एक हजार ९३६ कंपन्या बंद पडल्या. सर्वाधिक कंपन्या बंद पडलेल्या यादीत अव्वल पाच राज्यांच्या यादीत तामिळनाडू, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समावेश आहे. यापैकी तामिळनाडूत १३२२ कंपन्या, महाराष्ट्रात १२७९ कंपन्या आणि कर्नाटकमध्ये ८३६ कंपन्या बंद पडल्या आहेत.

 

 

Advertisement

Advertisement