राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. विविध योजना आणि निधीची घोषणा केली. राज्य सरकारकडून पेट्रोल-डिझेल दरात कपात केली जाणार असल्याची चर्चा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सुरू होती. मात्र, सरकारकडून कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. फडणवीस यांनी केलेल्या टीकेला जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अर्थसंकल्पानंतर बोलताना पाटील म्हणाले, “अर्थसंकल्पात सर्वस्तरावर सर्वांना न्याय देण्याचं काम अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. विशेषतः रस्ते, जलसंपदा आणि पायाभूत सुविधा यामध्ये मोठी गुंतवणूक राज्य सरकारने केलेली दिसते. त्यामुळे करोनामुळे अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला वेग येईल, असं मला वाटतं. अर्थसंकल्पाला दहा पैकी दोन गुण कमी दिले कारण अर्थमंत्री यांच्याच पक्षाचा आहे, असं म्हणून लोकं मला निष्पक्ष नसल्याचं म्हणतील. लोकांना बरं वाटावं म्हणून कमी मार्क दिले,” असं जयंत पाटील म्हणाले.
पेट्रोल डिझेलवरील करामध्ये कपात केली जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, सरकारने कोणताही उल्लेख याबद्दल केला नाही. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टिका केली. त्यांच्या टीकेला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. पाटील म्हणाले,”चोराच्या उलट्या बोंबा असंच याच्यापेक्षा वेगळं वर्णन याचं करता येणार नाही. ज्या टक्केवारीने पेट्रोल डिझेलवर कर लावलेला आहे. केंद्र सरकारचा दर सातत्याने वाढतोय. १०० रुपये पार केले. ही पूर्णपणे जबाबदारी दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकारची आहे. त्यांनी पेट्रोल डिझेलवरील दर वाढवायचा, त्यावर देश चालवायचा आणि राज्यांनी कर न वाढवता जो आहे, तोच ठेवला. तर राज्यांना त्याचे कर कमी करायला लावायचे, हा पूर्णपणे राज्यांवर अन्याय आहे. केंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले, तर राज्यांच्या महसूलामध्येही घट होईल. त्यामुळे केंद्र सरकारला देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन सांगावं की, आम्हाला पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून द्या म्हणजे राज्यातील जनतेवरील पेट्रोल-डिझेलचा बोझा कमी होईल,” असा सल्लाही पाटील यांनी फडणवीसांना दिला आहे.