उस्मानाबाद दि.८ - पोलिसाने बंदूक दाखवून वारंवार अत्याचार केल्यामुळे शहरातील बार्शी नाका परिसरातील एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.या प्रकरणी हरीभाऊ भास्कर कोळेकर या पोलीस कर्मचाऱ्यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. पीडित महिलेच्या पतीने दि.7 रोजी टाका ( ता. औसा ) येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
शहरातील बार्शी नाका परिसरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने 2 मार्च रोजी सायंकाळी गळफास घेवून आत्महत्या केली होती.सुसाईड नोटमध्ये पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हरीभाऊ भास्कर कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे नमूद केले होते. यावरुन संबंधीत पोलीसाविरुध्द भा.दं.सं. कलम- 376, 306, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या पोलीस कर्मचाऱ्यास बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.
उत्तम नारायण शिंदे ( वय ४५ ) असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास औसा तालुक्यातील टाका येथे - गुळखेडा रस्त्यावरील जटे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. उत्तम शिंदे यांना दोन बायका होत्या. दुसऱ्या बायकोचे पोलीस कर्मचारी हरीभाऊ भास्कर कोळेकर याच्याशी अनैतिक संबंध होते. त्यातून नवरा बायकोचे भांडण होत होते. यातून पीडित महिला त्रासून गेली होती. मात्र पोलिस कर्मचारी कोळेकर याने बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केल्याने आपण आत्महत्या केल्याची सुसाईड नोट तिने लिहिली होती.
सदरील प्रकरणी पोलीस कर्मचारी हरीभाऊ भास्कर कोळेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. मात्र उत्तम नारायण शिंदे यांनी आत्महत्या का केली ? याची चर्चा सुरु आहे. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी उत्तम शिंदे याने एक व्हिडीओ शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, आत्महत्या करण्याचे कारण की हरिभाऊ कोळेकर यांनी माझा हसता खेळता परिवार उध्वस्त केला आहे. माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर माझ्या पत्नीने आत्महत्या केली. "हरिभाऊ कोळेकर म्हणतो की माझे खूप दूर पर्यंत संबंध आहेत मी या प्रकरणातून सहज बाहेर पडेन" त्याला फाशी झालीच पाहिजे असे म्हटले आहे.