Advertisement

डिझेल दरवाढीमुळे बिघडले शेतीचे गणित !      

प्रजापत्र | Monday, 08/03/2021
बातमी शेअर करा

बीड दि.५ (प्रतिनिधी)-सध्याचे युग हे यांत्रिक युग असल्याने शेतकरी यांत्रिक शेतीला पसंती देतात.पूर्वी शेतीची कामे बैलांच्या साहाय्याने केली जात होती, मात्र सद्य:स्थितीत बैलांची संख्या कमी झाली असून ट्रॅक्टरद्वारे शेती करण्यावर भर दिला जात आहे.  ट्रॅक्टरमुळे तीन दिवसांची कामे आता एका दिवसात होत असली तरी इंधन दरवाढीमुळे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.सध्या बीड जिल्ह्यात डिझेलने ८८ रुपयांची पातळी लिटरमागे ओलांडली असल्याने शेतीचे गणित वाढत्या दरवाढीमुळे बिघडल्याचे चित्र आहे.
             इंधन दरवाढीचा फटका आता शेतकऱ्यांना बसू लागला आहे. बहुसंख्य शेतकरी शेतीकामासाठी ट्रॅक्टर वापरतात. शेतीतही यांत्रिकीकरणाचा शिरकाव झाला आहे. यामुळे ट्रॅक्टरसह विविध उपकरणांना इंधनाची गरज भासते. डिझेल दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांचा मशागतीचा खर्च वाढला आहे.शेतात एक पिक काढले की, अवघ्या एका दिवसात शेतीची मशागत करून दुसऱ्या पिकाची तयारी सुरू होते. यासाठी विविध अवजारे व साहित्य साधनांचा वापर होतो. ५० टक्के यंत्र साहित्याला आज डिझेल वापरले जाते. यंत्रामुळे शेतकऱ्यांची वेळेची बचतीसह परिश्रम वाचले असले तरी शेतीसाठी लागणारा खर्च वाढला आहे. इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरने भाडेतत्वावर काम करणाऱ्यांनीही नांगरणी, वखरणी यासह विविध कामांचे दर वाढविले आहेत. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती मशागत अवघड झाली आहे. शेतीसाठीचा उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारा बाजारभाव व सर्व खर्च पाहता शेतमालाला हमी भाव मिळणे आवश्‍यक झाले आहे.

 
मशागतीचे दर (प्रति एकर)        मागील                 चालू              वाढ  
नांगरणी ः                            ११०० रु                १७०० रु          ६०० रु
रोटर मारणे :                           १२०० रु               १९०० रु          ७००  रु
वाफे तयार करणे                     १०००  रु               १३०० रु          ३००   रु
सरी पाडणे :                            ९००  रु                 १५०० रु          ६००रु
पेरणी :                                   १००० रु               १६०० रु           ६०० रु  

 
शेतकऱ्यांची आर्थिक समीकरणे बिघडली
पूर्वी पारंपरिक शेतीत मशागतीसाठी बैलजोडीस प्राधान्य दिले जायचे. यंत्रयुगात बैलजोडी जवळपास हद्दपार झाली आहे. अशा स्थितीत शासनाने इंधन व ट्रॅक्टरसाठीच्या डिझेलकरिता दरात सवलत व अनुदान देणे गरजेचे आहे.वाढत्या महागाईमुळे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक समीकरण बिघडत चालले आहे.  
बाबुराव जेधे   (शेतकरी)

 
बैलजोडी ही लाखाच्या घरात
सध्या अल्पभुधारक शेतकऱ्यांचे जगणे सर्वाधिक अवघड झाले आहे.वाढत्या इंधन दरवाढीमुळे शेतीचे मशागतीचे कामांना हजारो रुपयांचा खर्च येत असून बैलजोडी ही खरेदी करणे सोपे राहिले नाही.आज बाजारात चांगली बैलजोडी खरेदी करायची झाली तर लाख रुपये खर्च येतो.मध्यम बैलजोडीसाठी ८० ते ८५ हजार खर्च करावा लागतो.त्यामुळे ट्रॅक्टर आणि बैलजोडी हे दोन्ही ही वाढत्या महागाईमुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बजेटच्या बाहेरील गोष्टी होऊ लागल्या आहेत.

 
९ महिने उलटूनही विम्याची रक्कम मिळेना
मागील जून महिन्यात शेतकऱ्यांनी खरिपाचा विमा भरला होता.आज ९ महिने उलटूनही शेतकऱ्यांना विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहावे लागत आहे.जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी ही विम्याच्या रक्कमेबाबत आवाज उठवत नसल्याचे चित्र असून विमा कंपन्यांच्या मुजोरीपणाला आळा घातला पाहिजे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

 

Advertisement

Advertisement