Advertisement

जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी गृहमंत्र्यांची क्लीन चिट

प्रजापत्र | Thursday, 04/03/2021
बातमी शेअर करा

 राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याचा मुद्दा बुधवारी चांगलाच गाजला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी निवेदन सादर करत सहा महिला अधिकाऱ्यांनी सादर केलेला अहवाल पटलावर मांडला. अनिल देशमुख यांनी यावेळी महिलांचं वसतिगृह असल्याने तिथे पोलीस कर्मचारी जाऊ शकत नसल्याचं सांगत, पोलिसांवरील आरोपात तथ्य नसल्याची माहिती दिली.

अनिल देशमुख यांनी काय सांगितलं –
“वसतिगृहात काही सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते त्यात गरबा, कविता वाचन, गाण्याचा कार्यक्रम होता. महिला अधिकाऱ्यांनी तिथे भेट देऊन सर्व कामकाज पाहिलं, महिलांशी चर्चा केली. महिलांचं वसतिगृह असल्याने एकही पोलीस कर्मचारी तिथे आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये कोणी अधिकारी कधी आतमध्ये आल्याची नोंद नाही. त्यामुळे अशा पद्धतीने व्हिडीओ झाला, नग्न व्हायला लावलं आणि पोलिसांनी व्हिडीओ काढला यामध्ये काही तथ्य नाही. तशा पद्धतीचा अहवाल महिला अधिकाऱ्यांन दिला असून तो मी पटलावर ठेवतो,” असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

यानंतर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी करोना काळात असे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास कोणी परवानगी दिली? अशी विचारणा केली. त्यावर उत्तर देताना अनिल देशमुख यांनी सांगितलं की, “१७ महिलांना कविता म्हणण्याचं, गाणी गाण्याचं बंधन नाही. तिथे फक्त १७ महिला होत्या”.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी यावेळी १७ पैकी पाच मुली १८ वर्षाच्या खालील असूनदेखील त्या गर्भवती असल्याने बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची बातमी खरी आहे का ? अशी विचारणा केली. यावर अनिल देशमुख यांनी हे वृत्त चुकीचं असून हे मुलींचं नाही तर महिलांचं वसतिगृह असल्याची माहिती दिली. तसंच ज्या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे त्यांच्यावर कारवाई करु असंही त्यांनी सांगितलं.

Advertisement

Advertisement