कृत्रिम दूध तयार करून त्याची खऱ्या दुधात भेसळ करून विक्री करण्याचा प्रकार राहुरी तालुक्यात उघडकीस आला. अन्न व औषध प्रशासनाने दोन दूध संकलन केंद्रावर छापा टाकून ही कारवाई केली. या दोन्ही केंद्रांचा परवाना रद्द करण्यात आला असून, त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तेथे तयार करण्यात आलेले दूध अधिकाऱ्यांनी जप्त करून नष्ट केले. भेसळयुक्त दुधाची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यात व्हे प्रोटीन पावडर मिसळण्यात येत असल्याचे आढळून आले.
राहुरी तालुक्यातील शिलेगावजवळच्या कपारवाडीत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने ही कारवाई केली. भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आले असून त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य तपासणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे, त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र, या दोन्ही दूध केंद्रांचे परवाने तत्काळ रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न, औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी दिली. शिंदे यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुटे, शरद पवार, नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर यांच्या पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. दोन दूध संकलन केंद्रांवर छापे मारले.
डॉ. दिलीप रघुनाथ म्हसे यांच्या गोरक्षनाथ दूध संकलन केंद्रावर टाकलेल्या छाप्यात दूध भेसळीसाठी शंभर किलो व्हे पावडर, ४० लिटर व्हे पावडर द्रावण व ३०० लीटर गाईचे दूध असा २४,९३१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हा सर्व माल तेथील एका गोठ्यात ठेवण्यात आला होता. दुसरी कारवाई म्हसे पाटील दूध संकलन केंद्रावर करण्यात आली. तेथे १५ किलो व्हे पावडर, ३०० लिटर गाईचे दूध असा ११,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही दूध संकलन केंद्रांचे मिळून सुमारे ६०० लिटर भेसळयुक्त दूध जागेवर ओतून नष्ट करण्यात आले. ही दोन्ही केंद्र सील करण्यात आली आहेत.
शिंदे यांनी सांगितले की, ‘या ठिकाणी भेसळयुक्त दूध तयार होत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सकाळी छापे मारले. हे व्यावसायिक परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध संकलित करताता. त्यांच्याकडे दररोज सुमारे सातशे ते आठशे लिटर दूध संकलित होत असे. मात्र, त्यात ते कृत्रिम दुधाची भेसळ करून त्याचे हजार लीटर दूध बनवत आणि पुढे विक्रीसाठी पाठवत होते. आम्ही घातलेल्या छाप्यात हा प्रकार उघडकीस आला आहे.’
भेसळयुक्त दूध ओळखले जाऊ नये, तपासणीत ते गुणवत्तापूर्ण ठरावे यासाठी त्यात व्हे प्रोटीन पावडरची भेसळ करीत. ही पावडर दुधापासून पनीर किंवा चक्का तयार केल्यानंतर राहिलेल्या पाण्यापासून तयार केली जाते. खेळाडू ती पुरक आहार म्हणून सेवन करतात. त्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. मात्र, जादा प्रमाणात त्याचे सेवन हानीकारक ठरू शकते. राहुरीत पकडण्यात आलेल्या या भेसळयुक्त दुधात ही पावडर मिसळी जात असल्याचे आढळून आले.
बातमी शेअर करा