Advertisement

30 टक्के पद भरती बाबत राज्य सरकार सकारात्मक

प्रजापत्र | Wednesday, 03/03/2021
बातमी शेअर करा

मुंबई दि.३ - कृषी विभागातील सुमारे ३० टक्के पदे रिक्त आहेत. या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा दबाव असतानाच शेतकऱ्यांना योजनांचा लाभही मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे पदभरती करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे.

              कृषिमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत मंगळवारी सांगितले की, राज्यात कृषी विभागासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील एकूण २७ हजार ५०२ पदांचा आकृतिबंध मंजूर असून त्यापैकी १८ हजार ६२२ पदे भरलेली आहेत, तर ८ हजार ८८० पदे रिक्त आहेत. विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात येतील. तसेच तांत्रिक संवर्गाची २० हजार १८१ पदे मंजूर असून त्यापैकी १४ हजार ८०९ पदे भरलेली आहेत, तर ५ हजार ३७२ पदे रिक्त आहेत. १६ मे २०१८ शासन निर्णयानुसार तांत्रिक संवर्गातील १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही भुसे यांनी स्पष्ट केले आहे.

         दरम्यान वित्त विभागाच्या ४ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्बंध असल्याने तूर्तास ही पदे भरता आली नाहीत. या आदेशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय संवर्गातील पदे भरण्यावर मर्यादा आहेत. मात्र, लवकरच करोना नियंत्रित येईल आणि त्यानंतर पदभरती केली जाईल असे भुसे यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement