राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यात 8 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण अशा विविध मुद्द्यांनी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विरोधकांनी मुद्दे शांतपणे मांडावे जेणेकरून गोंधळ होणार नाही असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. तर सरकार अधिवेशन टाळण्यासाठी कोरोनाची नाटके करत आहे. राज्यातील वाढीव वीज बिल आणि संजय राठोड मुद्द्यावरून अधिवेशनात सरकारची गोची होणार हे सरकारला माहिती आहे. त्यामुळेच अधिवेशनातून पळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तर हिंमत असेल, तर अविश्वास ठराव आणून दाखवा, असे खुले आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
वैधानिक विकास महामंडळावरून सरकार विरोधकांत जुंपली
राज्य सरकारने आतापर्यंत वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही याचे उत्तर द्यावे. असा जाब भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारला विचारला. 72 दिवस झाल्यानंतर सरकार काहीच करत नाही. विदर्भ, मराठवाड्यात लोक राहतात हे सरकारच्या लक्षात आहे का असा घणाघात त्यांनी केला. त्यावर अजित पवारांनी उत्तर देताना म्हटले की 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग अजून मोकळा झालेला नाही. त्या आमदारांची ज्या दिवशी होईल त्याच दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळाची घोषणा करू. अजित पवारांच्या उत्तराला प्रत्युत्तर देताना अजित दादांचे पोटातले ओठात आले आहे. 12 आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातील लोक ओलीस ठेवले का त्यांनी? तेथील जनता तुम्हाला माफ करणार नाही असा प्रहार फडणवीस यांनी केला.
शेतकरी, महाराष्ट्रातील पेट्रोल आणि डीझेलवर लागणारा कर, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण आणि त्याचा संजय राठोड यांच्याशी कथित संबंध यावरून विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. देशातील सर्वाधिक पेट्रोलचे भाव असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होतो. केंद्र सरकारचा एकूण टॅक्स 32 रुपये आहे. राज्य सरकारनं 27 रुपये टॅक्स पेट्रोलवर लावला आहे. इंधन दरवाढीविरुद्ध नाना पटोलेंचे यांचे आंदोलन म्हणजे नाटक आहे. हे आंदोलन राज्य सरकारविरोधात असेल. असेही फडणवीस म्हणाले आहेत.