केज दि.२८ - उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या वस्तीत जाऊन तोफा, अँटम बॉम्ब वाजवून दहशत निर्माण केली. या प्रकारामुळे घाबरून पोलीस ठाण्याकडे निघालेल्या फिर्यादी सरपंच पतीस आरोपीने शिवीगाळ करीत लाथाबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील जानेगाव येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात आणखी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
जानेगाव येथील सरपंच आम्रपाली ओव्हाळ यांचे पती विलास दशरथ ओव्हाळ हे २ ऑक्टोबर २०२० रोजी केज येथून गावाकडे जात असताना गावातील अशोक फुलचंद शिंदे व इतर दोघांनी रस्त्यात अडवून जातीवाचक शिवीगाळ करीत मारहाण केली होती. याप्रकरणी अशोक शिंदे यांच्यासह इतर दोघांविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, २६ फेब्रुवारी २०२१ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अशोक शिंदे याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर अशोक शिंदे याने २६ फेब्रुवारी रात्री ८.३० वाजता फिर्यादी विलास ओव्हाळ यांच्या वस्तीत जाऊन दोन तोफा वाजविल्या. या प्रकारामुळे घाबरून गेलेले ओव्हाळ यांचे कुटुंब घरातून जाऊन बसले. मात्र तोफा वाजवून समाधान न झालेल्या अशोक शिंदे याने काही वेळाने ओव्हाळ यांच्या घराच्या अंगणात जाऊन अँटम बॉम्ब वाजविला. त्यामुळे ओव्हाळ यांच्या कुटुंबात आणखी भीतीचे वातावरण पसरल्याने विलास ओव्हाळ हे त्यांचा भाऊ हनुमंत याला सोबत घेऊन युसुफवडगाव पोलीस ठाण्याकडे दुचाकीवरून निघाले होते. तर गावातील झोपडपटटीजवळील पुलाजवळ अशोक शिंदे हा रस्त्यावर उभा होता. त्याला आमच्या घरासमोर अँटम बॉम्ब का लावला अशी विचारणा केली असता अशोक शिंदे याने गच्चीला धरुन ओढून चापटाने लाथाबुक्याने मारहाण केली. शिवीगाळ करीत तू त्याचवेळेस वाचलास, तुला जिवे मारुन टाकीन अशी धमकी तेथे उपस्थित वस्तीवरील लोकांसमोर दिली. त्यावेळी उपस्थित असलेल्या गावातील भास्कर मदन शिंदे, निळकंठ गिरी, भाऊ हनुमंत व इतर लोकांनी भांडणाची सोडावासोडव केली. अशी फिर्याद विलास ओव्हाळ यांनी दिल्यावरून अशोक शिंदे याच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. केजचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, जमादार संजय राठोड हे पुढील तपास करत आहेत.
बातमी शेअर करा