Advertisement

आता खासगी रुग्णालयातही मिळणार करोनाची लस!

प्रजापत्र | Saturday, 27/02/2021
बातमी शेअर करा

भारतात सीरम इन्स्टिट्युटची Covishield आणि भारत बायोटेकची Covaxin या दोन करोना लशींना केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे देशभरात सरकारतर्फे मोफत या लशींचं लसीकरण केलं जात आहे. सध्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही लस देशातील वेगवेगळ्या वर्गांना दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता खासगी रुग्णालयांमध्ये देखील करोनाची लस मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी शनिवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे. लवकरच यासंदर्भातली घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, खासगी रुग्णालयात गेल्यास पैसे देऊन ही लस घ्यावी लागणार आहे. त्यासाठीचे दर देखील सरकारने निश्चित केल्याचं सांगितलं जात आहे.

खरेदी करावी लागणार करोनाची लस!

केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरोग्य सेवा पुरवणाऱ्या खासगी ठिकाणी (रुग्णालय, क्लिनिक, दवाखाने) करोनाची लस लवकरच मिळू शकणार आहे. मात्र, खासगी ठिकाणी ही लस खरेदी करावी लागणार आहे. त्यासाठीची कमाल किंमत देखील सरकारकडून निश्चित करण्यात येईल. सरकारच्या माध्यमातून दिली जाणारी लस मात्र पूर्णपणे मोफत असेल. तिचा खर्च हा पूर्णपणे सरकारकडून उचलला जाईल.”

किती असेल लशीची किंमत?

दरम्यान, खासगी ठिकाणी दिल्या जाणाऱ्या लशीसाठी २५० रुपये किंमत निश्चित झाल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने दिलं आहे. या किंमतीमध्ये १०० रुपये सेवा शुल्क देखील समाविष्ट असेल. यासंदर्भात केंद्र सरकारकडून किंवा आरोग्य मंत्रालयाकडून अद्याप घोषणा करण्यात आलेली नसली, तरी ती लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देखील यासंदर्भात काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते. यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल, असं देखील त्यांनी सूचित केलं होतं.

Advertisement

Advertisement