Advertisement

११०० किलोमीटर पाय चालत त्यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन    

प्रजापत्र | Saturday, 27/02/2021
बातमी शेअर करा

माजलगाव-शहरातील ६२ वर्षीय राम प्रभाकर सितापती हे मागील १३ वर्षांपासून कसलाही खंड न पडू देता तिरुपती बालाजीच्या दर्शनला चालत जातात. माजलगाव येथून तिरुपती बालाजी हे अंतर ११०० किमी इतके आहे. राम सीतापती यांनी दररोज ४५ ते ५० कि.मी.चे चालत जात २३ दिवसात हे अंतर पार केले असल्याचे त्यांनी सांगितले. 
         राम सीतापती यांनी यावेळी सांगितले की, लातुर जिल्ह्यातील जळकोट येथील काही भाविक चालत तिरुपती बालाजीला जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे राम सितापती यांना देखील आपणही चालत जाऊन बाजालीचे दर्शन घ्यावे अशी भावना निर्माण झाली. यामुळे २००९ साली सीतापती यांनी जळकोट येथील लोकांसोबत न घाबरता जाण्याचा निर्णय घेतला. घरून प्रथम विरोध झाला. परंतु, समर्पित भाव आणि योग्य ती काळजी घेण्याचे सांगितल्याने त्यांचा विरोध मावळला. यावेळी प्रथमच चालत जात असल्यामुळे वेगळीच भावना निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या वर्षी केवळ २३ दिवसात बालाजी गाठले व बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर जे आत्मिक समाधान मिळाले ते सांगणे अवघड असल्याचे ते म्हणाले.२०१६ पर्यंत जळकोट येथील भाविक सोबत होते तर २०१७ साली लातुर जिल्ह्यातील हाडोळती येथील एका भाविका सोबत जाण्याचा योग आला. मात्र, २०१८ साली सोबत कोणी नव्हते तरीही त्यांनी खंड पडू न देता एकट्याने तिरुपती बालाजी गाठले. 

  
यावर्षी रस्ता बदलून गाठले तिरुपती 
२००९ पासून ते एकाच रस्त्याने चालत जात असत. परंतु, यावर्षी राम सितापती हे डिसेंबर महिण्यात रस्ता बदलून चालत गेले. संपूर्ण प्रवासात सितापती यांच्याकडे केवळ साधा मोबाईल आणि आवश्यक तेवढेच सामान असते. बदलेला रस्ता, नवीन प्रदेश,  भाषेचा अडसर असतानाही ठरल्याप्रमाणे दररोज ४५ -५० कि.मी. अंतर कापत त्यांनी पुन्हा २३ दिवसांमध्ये तिरुपती बालाजी गाठले.

Advertisement

Advertisement