तिकीट मशीनमध्ये बिघाड आल्याने चुकीचे तिकीट दिले गेले आणि नेमके तेच तिकीट तपासणी पथकाच्या हाती लागले. त्यामुळे चार वर्षे प्रामाणिकपणे सेवा देऊनही आपल्यावर कार्यवाही होईल, सोयरे-धायरे, मित्र व एस. टी. महामंडळ परिवारात आपली नाहक बदनामी होईल या भीतीपोटी माहूर एस. टी. आगाराचे वाहक संजय संभाजी जानकर (वय 55 रा.वाघी जि.नांदेड) यांनी शुक्रवारी (ता.26) सकाळी 4 च्या सुमारास आगाराच्या आवारात उभ्या असलेल्या एस. टी.क्रमांक (एम. एच. 20 बी.एल.4015) मध्ये गळ्याला फास लाऊन आत्महत्या केली. दरम्यान, त्यांनी तीन पानांची लिहिलेल्या नोटमुळे आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले.
बुधवारी (ता.24) वाहक संजय जानकर हे माहूर-नांदेड फेरीवर असताना त्यांनी महागांवच्या प्रवाशांकडून पैसे पूर्ण घेतले. मात्र, तिकीट धनोड्यापर्यंतचेच दिल्याची बाब एसटी महामंडळाच्या पथकाच्या तपासणीत निष्पन्न झाली होती. याप्रकरणी त्यांची चौकशी सुरू होती. यामुळे आता आपल्याला निलंबित केले जाईल, नातेवाईकात बदनामी होईल या भिती पोटी त्यांनी आत्महत्येच पाऊल उचलले. शुक्रवारी पहाटे सफाई कर्मचार्याच्या निदर्शनास ही बाब उघडकीस आली. यावेळी वाहक जानकर यांचा दोरीने लटकलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी ही माहिती इतर कर्मचार्यांना दिली
सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक नामदेव रीठे यांनी घटनास्थळी भेट दिली. बीट जमादार विजय आडे, प्रकाश देशमुख यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविले आहे.
नादुरुस्त तिकीट मशीन कारणीभूत
मृत जानकर यांच्या खिशात चिट्ठी सापडली असल्याची माहिती आगार प्रमुख व्ही. टी.धुतमल यांनी दिली. नादुरुस्त तिकीट मशीन संजय जानकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याची बाब त्यांनी लिहून ठेवलेल्या चार पानी पत्रातून उघड झाली आहे. राज्यातील अनेक आगारात तिकीट मशीन नादुरुस्त आहेत. याच नादुरुस्त तिकिट मशिनमुळे वाहक जाणकार यांना जीव गमवावा लागला.