दिल्ली : कथित टूल किट प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला दिल्लीच्या पतियाळा हौस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांनी मागील पंधरवड्यात दिशा रवीला अटक केली होती.
दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावर ग्रेट थान्बर्ग हिने प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कथित टूलकिट प्रकरणार दिशा रवी, निकिता जॅकोब आणि शंतनू मुळूक यांच्या विरोधात गुन्हे नोंद केले होते. पोलिसांनी या प्रकरणात दिशा रवीला अटक केली होती. या अटकेचा मोठ्या प्रमाणावर निषेध झाला होता. दिल्लीच्या न्यायालयाने दिशा रवीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर येथील पतियाळा हाऊस न्यायालयात दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. सुनावणी दरम्यान न्यायालयाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्ली पोलिसांना देता आली नव्हती तसेच कथित खलिस्तानवाद्यांशी दिशा रवीचा थेट संबंध काय येतो हे देखील सिद्ध करता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने दिशा रवीला मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. याच न्यायालयासमोर उद्या (दि. २४ ) शंतनू मुळूक च्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.