पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे चर्चेत राहतात… तशीच त्यांच्या आणखी एका गोष्टींची चर्चा असते, ती म्हणजे वक्तशीरपणा! अजित पवारांच्या कार्यालयीन कामाला सकाळपासूनच सुरूवात होते. त्यामुळे जिथे कुठे कार्यक्रम असेल, तिथल्या अधिकाऱ्यांची धांदल उडते. असाच प्रसंग पुण्यात अनुभवायला मिळाला.
राज्यात करोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यातही करोनाच्या नवीन प्रकाराची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यात पुन्हा करोना बळावणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जात असून, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली होती.
ही बैठक सकाळी नऊ वाजता सुरू होणार होती. त्यामुळे त्या हिशोबाने बैठकीची तयारी सुरू होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठ वाजताच अचानक बैठकीच्या ठिकाणी दाखल झाले. उपमुख्यमंत्री आधीच दाखल झाल्याचं कळाल्यानंतर प्रशासनाची धांदल उडाली. अजित पवार हे साधारण तासभर अगोदर आल्याने, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांची एकच धावपळ झाल्याची दिसून आलं.