Advertisement

“आम्ही तेल प्रकल्प उभारले, सात वर्षात तुम्ही काय केलं”

प्रजापत्र | Saturday, 20/02/2021
बातमी शेअर करा

पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडाला असून, सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. विरोधकांकडून सरकारकडे जबाब विचारला जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या वाढत्या दरांसाठी आधीच्या सरकारांना जबाबदार ठरवलं होतं. मोदींच्या या टीकेवरून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर पलटवार केला. “मागील सरकारने कमीतकमी देशातंर्गत तेल प्रकल्प तरी उभारले. तुम्ही सात वर्षांत काय केले ते सांगा,” असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.

“केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ होत आहे. आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यात केंद्र सरकार धन्यता मानत आहे, अशी टीका पृथ्वाराज चव्हाण यांनी केली. सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान कार्यक्रमासाठी ते साताऱ्यात आले होते. या वेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर, विराज शिंदे आदी उपस्थित होते.

इंधन दरवाढीबाबत प्रश्‍नावर विचारले असता चव्हाण म्हणाले, “देशाच्या मागणीच्या तुलनेत ८५ टक्के तेल आयात करावे लागत आहे. या तेलाची किंमत आंतरराष्ट्रीय पातळीवर निश्‍चित होते. चुकीच्या कररचनेमुळे आणि केंद्र सरकारच्या आडमुठेपणामुळे देशवासीयांना पेट्रोल, डिझेल महाग मिळत आहे. आधीच्या सरकारांनी देशातील साठ्यांचा शोध घेत तेल प्रकल्प उभारले आहेत. तुम्ही सात वर्षांत कोणते प्रकल्प उभारले ते जाहीरपणे सांगा. करोना काळातील मदतीचे फुगीर आकडे सांगत सर्वसामान्यांना लुटायचे काम सुरू आहे,” अशा शब्दात चव्हाण यांनी मोदींवर निशाणा साधला.

विविध कारणांवरून विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्याच्या प्रश्‍नावर चव्हाण यांनी भाजपाचा समाचार घेतला. “विरोधकांचे कामच टीका करणे असते. राज्यात सुरू असलेल्या अवकाळीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठीचा विषय येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडणार आहे,” असं चव्हाण म्हणाले. “जिल्हा बॅंक निवडणुकीबाबत आमची अंतर्गत चर्चा सुरू आहे. त्यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. आगामी काळात महाविकास आघाडीच्या धोरणानुसारच महामंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement