Advertisement

शिवनेरीवर शिवजंयतीचा उत्सव:'शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

प्रजापत्र | Friday, 19/02/2021
बातमी शेअर करा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर उत्साहाचे वातावरण होते. ढोल ताशांचा आवाजाने परिसरात उत्साह संचारलेला पाहायला मिळाला. मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 'शिवरायांपुढे नतमस्तक होण्यासाठी शिवजंयतीच असायला हवी असे नाही. कोणतेही पवित्र काम करताना शिवाजी महाराज आठवतात. कारण शिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत. हे शिवनेरीवर येण्याचे दुसरे वर्ष आहे. हा बहुमान शिवरायांच्या आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाने मिळाला आहे. मनात, हृदयात अखंड शिवरायांचे स्थान आहे. सध्या वातावरण चांगले आहे पण तोंडावर मास्क आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरू आहे' असे मुख्यमंत्री बोलताना म्हणाले आहेत.पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'सगळे ठिक आहे, फक्त तोंडावर मास्क आहे. या भूमीमध्ये, या मातीत हे तेज जन्माला आले, त्याच मातीतील आपण लेकरे आहोत. छत्रपतींनी ज्या लढाया केल्या. जो स्वराज्यावर चालून आला, त्याची विल्हेवाट कशी लावली हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. आता तसेच युद्ध नाही. मात्र कोरोनाबरोबर आपले युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये मास्क ही ढाल आहे.' असे मुख्यमंत्री म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवनेरीवर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आदींची उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement