जळगाव : लग्नाच्या ड्रेसवर सोन्याचे दागिने शोभत नसल्यामुळे पर्समध्ये काढून ठेवणं वधूला चांगलंच महागात पडलं. कारण चोरट्यांनी पर्स लंपास केल्याने 16 लाख 10 हजार रुपयांचे दागिने गमवण्याची वेळ आली आहे. जळगावात घडलेल्या घटनेनंतर वधूच्या कुटुंबीयांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. वधूच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे तिघे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत.
जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईजमध्ये ही घटना घडली. युवराज विश्वनाथ नेमाडे यांची कन्या दीपाली नेमाडे हिचे लग्न होते. जळगाव शहरातील नित्यानंद नगरातील हिमांशू गणेश फिरके यांच्यासोबत दीपाली विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नात तिने जो ड्रेस परिधान केला होता, त्यावर सोन्याचे दागिने शोभत नव्हते.मावशीचं लक्ष विचलित होताच डल्ला
लग्न लागण्यापूर्वीच दीपालीने सोन्याचे दागिने काढून एका पर्समध्ये ठेवले. ही पर्स दीपालीच्या मावशीकडे ठेवण्यात आली होती. पर्समध्ये दीपालीसह तिची आई आणि नवरदेवाला देण्यासाठीचे काही दागिने ठेवले होते. या दागिन्यांची एकूण किंमत 16 लाख 10 हजार रुपयांच्या घरात होती.
दागिन्यांची पर्स सांभाळणाऱ्या दीपालीच्या मावशीचं लक्ष विचलित झाल्याची संधी चोरट्यांनी हेरली. दोन सेकंदात एका अल्पवयीन चोरट्याने दागिने ठेवलेली पर्स उचलून पोबारा केला. ही पर्स पोटाशी लावून तो काही सेकंदातच हॉटेलच्या बाहेर पडला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली.
अल्पवयीन चोरटे कॅमेरात कैद
हॉलमधील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यात दोन्ही अल्पवयीन चोरटे आणि त्यांना सूचना करणारा तिसरा चोरटा दिसून आले आहेत. या प्रकरणी युवराज नेमाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पंचताराकिंत हॉटेलमध्ये लहान मुलांच्या सहाय्याने चोरी करणाऱ्या एका आतंरराज्यीय टोळीला वर्षभरापूर्वी नागपूर पोलिसांनी अटक केली होती. ही टोळी मोठ्या हॉटेलमधील लग्न समारंभात सूट-बूट घालून जायची. तिथे जाऊन लहान मुलांच्या मदतीने चोऱ्या करत होती. पोलिसांनी चार आरोपींना अटक करुन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला होता.