Advertisement

पवारांवर टीका नको, राष्ट्रवादीच्या 'या' आमदारानं चक्क विनंतीच केली

प्रजापत्र | Wednesday, 17/02/2021
बातमी शेअर करा

  नगर: आपल्या नेत्यावर कोणी टीका केली की समर्थकांनी विविध माध्यमांतून पेटवून उठण्याचा सध्या जमाना आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी टीकाकारांना चक्क नम्र विनंती केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेने व्यथित झाल्याने लंके यांनी ही विनंती केली आहे.

जेजुरी येथील कार्यक्रमातील पवार यांच्या भाषणावर अलीकडेच टीका होत आहे. त्यामध्ये पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात झाला, असे वक्तव्य केल्याची क्लीप व्हायरल करून यातून अहिल्यादेवी यांचा अवमान झाल्याची टीका केली जात आहे. त्याला उत्तर देताना लंके म्हणाले, 'ज्यांच्या राजकीय कारकीर्दीस पन्नास वर्षे पूर्ण झाले आहेत, अशा देशाच्या नेत्यावर दिशाहीन झालेले लोक टीका करत आहेत. पवार यांच्या जेजुरीतील भाषणाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. देशाचे नेतृत्व करताना येथील सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक अभ्यास पवारांएवढा कोणाचाही नाही. जे पवार यांच्यावर टीका करतात, त्यांची वैचारिक पातळी घसरलेली आहे, अशा शब्दांत लंके यांनी विरोधकांचा समाचार घेतला आहे.
'अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा पवारांएवढा अभ्यासही या टीकाकारांचा नाही. राज्यातील सर्व टीकाकारांना मी नम्र विनंती करतो की, पवारांसारख्या व्यक्तीमत्वावर कोणीही हेतूपुरस्पर, राजकीय फायद्यासाठी टीका करू नये. त्यांच्यावर खोटे आरोप करून बदनामी करणे चुकीचे आहे. त्यामुळे मी सर्वांना नम्र विनंती करतो की, हे जे राजकारण चालविले आहे, ते थांबविणे गरजेचे आहे, असेही लंके यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement