मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कडक कारवाई
संयमी पण कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन, कडक कारवाई केली. उद्धव ठाकरे यांनी कारवाई केलेले हे पहिलेच मंत्री ठरले आहेत. महत्त्वाचं म्हणजे संजय राठोड हे महाविकास आघाडीचे मंत्री असले तरी ते शिवसेनेचे नेते आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वत:च्या मंत्र्यावर कारवाई करुन कडक इशारा दिला आहे.
नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा?
संजय राठोड यांनी नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा दिला हे एव्हाना राज्याला माहिती झालं आहे. मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.
ऑडिओ क्लिपमधून उलगडा ?
पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचाही खुलासा किंवा माहिती ना पोलिसांनी दिली ना, पूजाच्या कुटुंबियांनी. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना देत असल्याचं समजतं. हे संपूर्ण प्रकरण तापत गेलं आणि ते संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर येऊन पोहोचलं.
पूजाला न्याय मिळणार?
दरम्यान, या प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा तर घेतला आहे. मात्र आता संजय राठोड यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार का हे पाहावं लागणार आहे. कारण ना राजीनाम्याने, ना संजय राठोड यांना शिक्षा केल्याने, पूजा परत येऊ शकेल. मात्र कायदा हा सर्वांसाठी समान आहे हे जर पुन्हा एकदा सिद्ध करायचं असेल तर संबंधित मंत्र्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अशी मागणी विरोधक करत आहेत, त्यात गैर काहीच नसावं.