बीड दि.१ (प्रतिनिधी): बीड नगरपालिकेत अध्यक्ष आणि एकूणच सत्तेवर दबावगट निर्माण करण्याच्या प्रयत्नातून सत्ताधाऱ्यांमधीलच एका गटाने केलेले बंड अखेर पेल्यातील वादळ ठरले आहे. एकमेकांना सभागृहात केलेला टोकाचा विरोध, त्याचे समाजमाध्यमातून केलेले प्रदर्शन या साऱ्या पार्श्वभूमीवर बंडखोरांना पालिकेत इतर कोणाकडून रसद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे वाद मिटविण्यात आले असून सत्ताधारी नगरसेवकांची 'चाय पे चर्चा' करत झालेली दिलजमाई आता चर्चेचा विषय ठरत आहे.
बीड नगरपालिकेच्या डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत यावेळी प्रथमच पालिकेतील सत्ता क्षीरसागर कुटुंबाच्या बाहेर गेली आणि आ. विजयसिंह पंडितांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने पालिकेवर वर्चस्व मिळविले. राष्ट्रवादीला नगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसले तरी अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे असल्याने आता बीडकरांना दाखविलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नगरपालिकेचा कारभार सुसाट सुरु होईल अशी अपेक्षा होती, मात्र काही महिन्यातच सत्ताधारी राष्ट्र्वादीतच बंडाची ठिणगी पडली आणि सत्तेतल्या ११ नगरसेवकांनी 'वेगळी' भूमिका घेतल्याचे चित्र बीडकरांना पाहायला मिळाले. त्याचे पडसाद अगदी अध्यक्षांना 'अपात्रतेच्या' नियमांची जाणीव करून देण्यापासून ते उपाध्यक्षांना 'खाली बसण्याची' समज देण्यापर्यंत उमटले. सत्तेतल्याच वादांमुळे शहरातील विकासकामे तर रखडलीच, मात्र सत्ताधाऱ्यांमधले वाद समाजमाध्यमे, बॅनरबाजी आणि सभागृहातील खडाजंगी याच्या माध्यमातून चव्हाट्यावर आल्याने आ. पंडित यांना देखील 'याच साठी केला होता का अट्टाहास?' असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
सत्ताधाऱ्यांमधील बंडखोरांना या सर्व प्रकारात आपल्याला पक्षातून आणि इतर ठिकाणाहून रसद मिळेल असे अपेक्षित होते. तशी बंडखोरांना थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचण्याची व्यवस्था झाली देखील, शिवसेनेमध्ये देखील आपले गाऱ्हाणे पोहचेल अशीही खेळी खेळली गेली, मात्र यातील कोणतीच 'बाजी' उपयोगाची ठरली नाही. पालिकेच्या सभागृहात भाजप आणि राष्ट्रवादी शप या दोन्ही गटांचे क्षीरसागर बंडखोरांना बळ मिळेल अशी भूमिका घेणार नसल्याचे देखील स्पष्ट झाले आणि त्यातूनच मग काहींनी राजकारणात सबुरीची 'तालीम' देत बंडखोर आणि राष्ट्रवादी यांच्यात 'दिलजमाई' घडविल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे बंडखोरांना खिंडीत गाठण्यासाठी कामाचे तुकडे पाडण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे मागविलेले मार्गदर्शन आणि त्या कामांची पाहणी करण्यात जिल्हाधिकारी कार्यालयातून होत असलेला विलंब, एकूणच प्रशासनाचा 'विवेक' कोणाच्या बाजूने जगणार याचा बंडखोरांना आलेला अंदाज देखील या दिलजमाईसाठी महत्वाचा ठरल्याचे सांगितले जात आहे. कारणे काहीही असोत,बीड नागरपालिकेतले राष्ट्रवादीमधील बंड पेल्यातले वादळ ठरले असून आता तरी बीडमध्ये राष्ट्रवादीचा आणि विकासाचा 'आशियाना' बहरणार का असा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे.

