Advertisement

प्रत्येक फाईलकडे लाईफ म्हणून पाहिलं

प्रजापत्र | Thursday, 09/07/2020
बातमी शेअर करा

माझ्यासमोर वैद्यकीय कक्षात जी रूग्णाची फाईल यायची त्याकडे मी केवळ कागद म्हणून किंवा फाईल म्हणून पाहिलं नाही तर अशा प्रत्येक फाईलकडे मी एक लाईफ म्हणून पाहत गेलो आणि त्यातूनच महाराष्ट्रातल्या कितीतरी लोकांना जगण्यासाठी मदत करता आली आज त्याचं प्रचंड समाधान आहे या शब्दात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

व्हिडिओ मुलखात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा 
https://youtu.be/DKmcOmos9JE

 

प्रश्‍नः महाराष्ट्रात वैद्यकीय सहाय्यता कक्ष घराघरात पोहचला तो आपल्यामुळे. हे सर्व साधलं कसं?
ओमप्रकाश शेटेः महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा मुख्यमंत्र्यांचा हक्काचा निधी. मुख्यमंत्र्यांना जिथे म्हणून मदत करण्याची इच्छा असते त्या ठिकाणी हा निधी वापरला जायचा पण 2014 पर्यंत वैद्यकीय सहाय्यता कक्ष वेगळा नव्हता. मी मागच्या 18-19 वर्षापासून या क्षेत्रात काम करतो त्यामुळे असा वेगळा कक्ष असावा अशी कल्पना होती आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला बळ दिलं.

प्रश्‍नः फडणवीसांच्या संपर्कात  तुम्ही कसे आलात?
ओमप्रकाश शेटेः देवेंद्र फडणवीसांची आणि माझी तशी जुनीच ओळख होती. अगदी त्यांच्या शपथविधीच्या दिवशी सकाळी आम्ही मॉर्निंगवॉकला सोबत होतो. ते मला सामाजिक क्षेत्रात काम करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखत होते. त्यातूनच मग शपथविधीनंतर मी त्यांच्यासमोर मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये एक वेगळा वैद्यकीय सहाय्यता कक्ष असावा असा प्रस्ताव मांडला.

प्रश्‍नः तो सहजा सहजी मान्य झाला का?
ओमप्रकाश शेटेः प्रशासनात कोणत्याच गोष्टी सहजा सहजी होत नसतात. असा काही तरी वेगळा कक्ष करायचा आणि तो पुन्हा एखाद्या प्रशासना बाहेरच्या व्यक्तीकडे सोपवायचा, सारे अधिकार बाहेरच्यांना द्यायचे याला नोकरशाही तयार नव्हती. तब्बल 4 महिने या बाबतचा संघर्ष सुरू होता पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतःची या बाबतची इच्छाशक्ती तीव्र होती आणि म्हणूनच चार महिन्यानंतर एकेदिवशी संध्याकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला आणि मला बोलावले गेले. विशेष म्हणजे रात्री 1 च्या सुमारास मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाची ऑर्डर मला देण्यात आली.

प्रश्‍नः हे सर्व करताना मुख्यमंत्र्यांनी  नेमकं काय सांगितलं?
ओमप्रकाश शेटेः तब्बल चार महिन्याच्या संघर्षानंतर हा कक्ष अस्तित्वात आला. या कक्षाच्या माध्यमातून खुप काही करण्याची माझी इच्छा होती आणि मी ते मुख्यमंत्र्यांना बोलूनही दाखविलं होतं. शेवटी उटताना मी त्यांना नेमकं काम कसं करणं अपेक्षीत आहे असा प्रश्‍न विचारला त्यावेही त्यांनी महाराष्ट्रात एकही माणुस पैशा अभावी मरता कामा नये’ असं काम करा असं सांगितलं आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या इतिहासात यापुर्वी कधीच नव्हतं इतकं मोठं काम या माध्यमातून आम्हाला उभारता आलं.

प्रश्‍नः वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करताना त्याचा आवाका इतका मोठा असेल असं वाटलं होतं का?
ओमप्रकाश शेटेः वैद्यकीय कारणासाठी लोकांना मदतीची गरज आहे याची जाणीव होती. मागच्या 17-18 वर्षापासून याच क्षेत्रात असल्याने राज्यातील गरीबी, दारिद्रय, पैशामुळे दुखणे अंगावर काढण्याची मानसिकता या सर्वांचा अभ्यास झालेला होता पण तरीही प्रत्यक्ष काम करताना इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज येतील असं वाटलं नव्हतं. पण लोकांना मदत मिळत गेली आणि म्हणून लोकांचा ओढाही वाढला.

प्रश्‍नः हे सगळं करताना कोणी खोटेपणा करतंय असे अनुभव आले का?
ओमप्रकाश शेटेः मुळात ही मदत लोक आरोग्याच्या कारणासाठी मागतात. अनेकजण मरणाच्या दारातले असतात आणि मरणाच्या दारात सहसा कोणी खोटं बोलत नाही. त्यामुळे समोर आलेली फाईल खरीच आहे असं समजुनच त्याकडे पहायचो. अर्थात कधीतरी एखादं खोटं प्रकरण समोर यायचंही नाही असं नाही. पण हे अपवादात्मक परिस्थितीत.

प्रश्‍नः रूग्णांना मदत करताना आपण अनेकदा प्रशासनाची चाकोरी बदलली, जिथं अगोदर कागदच मागितला जायचा तिथं आपण व्हॉट्सअ‍ॅपवर कागदपत्रे मागवून मदत केली. हे करताना उद्या कधी आरोप होतील, चौकशी होईल याची भिती वाटली नव्हती का?
ओमप्रकाश शेटेः मी जेव्हा कामाला सुरूवात केली होती त्यावेळी तत्कालिन मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण परदेसी यांनी मला एका शब्दात सांगितलं होतं की प्रशासनात कागदच चालतात म्हणून मी लोकांना मदत करताना ते डोक्यता ठेवले.उपचार सुरू करण्यासाठी कागदाचा अडथळा येवू नये हे मी पहायचो आणि नंतर मात्र माझी सर्व शक्ती वापरायचो. एखाद्या रूग्णाला कागद मिळत नसतील तर मी स्वतः मेल पाठवायचो. तहसिलदारांना बोलायचो. मुख्यमंत्री कार्यालयातून बोलतोय म्हटल्यानंतर त्यांनाही गांभीर्य कळायचं आणि त्यातून अनेक कामं होत रहायची.

प्रश्‍नः वैद्यकीय सहाय्यता कक्षातील ओमप्रकाश शेटे सर्वांना माहित आहेत पण त्यापुर्वीचे  ओमप्रकाश शेटे नेमके काय होते?
ओमप्रकाश शेटेः मी मुळचा उद्योजक, महाराष्ट्रात अनेक उद्योग उभे केले. त्या उद्योगाच्या माध्यमातून माणसं जोडतं गेलो, माणसं उभी केली.

प्रश्‍नः एका उद्योजकाला समाजाच्या अडचणींशी देणं घेणं निर्माण कसं होतं?
ओमप्रकाश शेटेः मी उद्योजक नंतर झालो पण लहानपणापासूनच मला समाजातील गरीबांना मदत करण्याची एक वेगळी ओढ होती. आपल्या सोबतच्या सर्वांना मदत केली पाहीजे असं वाटतं रहायचं. अगदी लहानपणी मी वडिलांच्या खिशातील पैसे चोरून माझ्या गरीब मित्रांची फि भरायचो. चोरी करणं वाईटचं. पण मित्रांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी मी ते करायचो.पुढे उद्योग उभे केल्यानंतर कधी उद्योगात अडचणी आल्या तर प्रसंगी बायकोचं सोनं मोडलं पण कर्मचार्‍यांच्या पगारी थांबविल्या नाहीत.

प्रश्‍नः मित्रांच्या फीसाठी चोरी करणं असेल अथवा बायकोचं सोनं मोडून पगारी करणं असेल ही भावना येते कोठून?
ओमप्रकाश शेटेः हे सारं माझ्यामध्ये आलं ते माझे वडील बंधू डॉ.शिवरत्न शेटे यांच्याकडून. ते शिवचरित्रकार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजाचं चरित्र त्यांच्याच माध्यमातून आम्हाला कळालं. शिवाजी महाराज हा अचारणाचा विषय आहे हे त्यांनीच सांगितलं आणि म्हणूनच रयत सुखी राहिलं पाहीजे हा शिवचरित्राचा महत्वाचा भाग आहे हे कायम डोक्यात बिंबलेलं होतं. म्हणूनच या सर्व  कामा मागची प्रेरणी अर्थातच शिवचरित्र आणि छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत.

प्रश्‍नः मग वैद्यकीय क्षेत्रात मदत करावी हे कसं सुचलं?
ओमप्रकाश शेटेः ही घटना साधारणतः 2003-04 ची आहे. अश्‍विन जाधव नावाचा माझा एक मित्र त्याला ब्लॅड कॅन्सर झालेला. मुंबईला टाटा हॉस्पीटलमध्ये दाखलं केलं. त्याचे वडील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत पण 14-15 लाखांचा खर्च सर्वांच्याच आवाक्या बाहेरचा. त्यावेळी त्याला हा खर्च उभा करून देण्यासाठी आम्ही धडपडलो. आम्ही एकत्र येवून निधी जमा केला आणि त्यातूनच मग आरोग्या क्षेत्रात काम करणं गरजेचं आहे हे लक्षात आलं.

प्रश्‍नः या सगळ्या काळात आपल्या मनावर कोरला गेलेला प्रसंग कोणता?
ओमप्रकाश शेटेः तसे तर रोजच अनेक प्रसंग घडत होते. ते सगळे आजही आठवतात. प्रत्येक माणुस म्हणजे एक प्रसंगच तरीही एक प्रसंग मनावर कायम कोरला गेलेला आहे. 2016 मध्ये घडलेली ही घटना. मी वैद्यकीय सहाय्यता कक्षात असताना सोमवार कधीच चुकवायचो नाही कारण शनिवार,रविवार सुट्टी असायची. लोक दुरून आलेले असायचे पण एका सोमवारी मला जाता आलं नाही. मी मंगळवारी 11 वाजता माझ्या कार्यालयाबाहेर एका आज्जीला पाहीलं तीला बोलविल्यानंतर ती तिच्या नातीसोबत आली होती. तिच्या नातीला अप्लास्टीक अनेमिया झालेला होता. तिच्या मदतीची पुर्ण प्रक्रिया पार पाडली. तिच्यासोबत तिची दुसरी नात होती शितल तिचं नावं. ही आज्जी आणि शितल वाशिम जिल्ह्यातल्या एकांबा गावातून आलेलं आदिवासी कुटूंब. मी शितलला पुढे काय व्हायचंय असं विचारलं तिनं मला डॉक्टर होवून जनतेची मदत करायचीय असं सांगितलं आणि ते निघून गेले.नंतर मी जेव्हा घरी आलो त्यावेळेस काहीतरी राहून गेलंय याची हुरहूर मनात होती मी अस्वस्त असल्याचं पत्नीच्या लक्षात आलं, तिनं काय झालंय हे विचारलं त्यावेळी मी तिला सकाळचा सगळा प्रसंग सागुन त्या शितलला मी किमान एक ड्रेसतरी घेवू शकलो असतो पण त्यावेळी मला ते सुचलं नाही असं सांगितलं. हे सांगताना मी रडलो सुद्धा. मात्र त्यावेळी माझ्या पत्नीने मला ती आज आठवीत आहे तिला डॉक्टर व्हायचं असलं तरी तिच्या घरचे तिला इतकी दिवस शिकवतील का?’ असं विचारून आपण तिच्यासाठी काही रक्कम डिपॉझिट करू असं सांगितलं. मी तिच्या नावाने एक लाख रूपये डिपॉझिट केले आता ती बारावी पास झाली आहे आणि तिचा डॉक्टर होण्यापर्यंतचा सर्व खर्च मी करणार आहे हा प्रसंग कायम लक्षात राहणारा ठरला.

प्रश्‍नः एका उद्योजकाला व्यवहारीक भाषेतील हे रिकामे उद्योग करायला सांगितलं कोणी होतं?
ओमप्रकाश शेटेः मुळात मी सामाजिक भावनेतूनच याकडे ओढला गेलो. कधी एक रूपयाची लाच खालली नाही पण मला धंद्यात कायम बरकत आणि मी माती हातात घेतली तरी त्याचं सोनं झालं. सामान्यांच्या आशिर्वादानं मला मोठं केलं. मी माझ्या समोरच्या कागदाकडे कधी फाईल म्हणून पाहीलं नाही तर लाईफ म्हणून पाहीलं आणि त्याचंच समाधान आहे.

प्रश्‍नः एखादा ओमप्रकाश शेटे असं करू शकतो पण असे ओमप्रकाश शेटे किती असणार? त्यासाठी या व्यवस्थेत काही धोरणात्मक निर्णय व्हावेत असं वाटतं का?
ओमप्रकाश शेटेः मी जेव्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अभ्यास केला त्यावेळी खरतर धक्का बसला होता. 7-8 हजाराचे धनादेश दिले जायचे. फारफार तर 25 हजारांची मदत दिली जायची. वर्षानुवर्ष हेच होत होतं. आजार वाढले, खर्च वाढला पण त्यात बदल नव्हता म्हणून मी जेव्हा काम हाती घेतलं तेव्हा मुख्यमंत्र्यांना ही मदतीची मर्यादा किमान दोन लाख केली पाहीजे असा मॅसेज केला. एकेदिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःच आमच्या कक्षात आले. आम्ही सगळेच आश्‍चर्यचकीत झालो. त्यांनी मला मेसेज बद्दल विचारलं. दरम्यान त्या दिवशी सकाळीच मला प्रविण परदेशी यांनी थेट काहीही मेसेज कसे करतो असं हक्कानं सुनावलं होतं पण मुख्यमंत्र्यांनी तिथल्या तिथे वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या समितीला दोन लाखापर्यंत मदतीचे अधिकार बहाल केले. नंतर ही मर्यादा तीन लाख करण्यात आली. त्यामुळेच आम्ही वैद्यकीय सहाय्यता कक्षातून 600 कोटी आणि धर्मादाय कोठ्यातून 900 कोटी असे 1500 कोटी रूपये वाटू शकलो. यापुर्वी विलासराव देशमुखांच्या काळात सर्वाधिक 47 कोटींची मदत झाली होती. 47 कोटींचा आकडा आम्ही 1500 कोटींवर नेला. त्यानंतर नवीन सरकारने तेच धोरण ठेवावे असे वाटत होते पण या सरकारच्या काळात ती मर्यादा 50 हजारावा आणण्यात आली आहे. मला कोणावर राजकीय टीका करायची नाही पण प्रशासनातल्या संवेदना जाग्या असायला हव्यात. नव्या निर्णयामुळे आता ही व्यवस्थाच कोलमडली आहे याचं दुःख वाटतं.

प्रश्‍नः आपण अनेकांचे आदर्श आहात, तरूणाईला काय सांगाल?
ओमप्रकाश शेटेः आज कोरोनाची आपत्ती असली तरी संकटातही संधी शोधायची असते. मराठी तरूण काम करायला लाजतो मात्र आज अनेक ठिकाणी कामाच्या नव्या संधी निर्माण झालेल्या आहेत. छोटे छोटे व्यवसाय करून त्यात आपले पाय रोवले पाहीजेत. प्रत्येक व्यक्ती इंड्रस्ट्रीज उभी करेल असे नाही पण ज्याला जे जमतं ते त्यानं झोकून देवून करावं आणि हे करतानाच सामाजिक भावना जाग्या ठेवाव्यात. तुम्हाला अनोळखी लोकांना मदत करायची नसेल तर हरकत नाही पण किमान तुमच्या नात्यातले, ओळखीतले जे कोणी गरजू असतील त्यांना तुम्हाला जमेल तेवढी मदत करा. यातला आनंद आणि समाधान फार मोठं असतं.

 

Advertisement

Advertisement