Advertisement

डोंगर घुसळून निघालेले मुरुमाचे 'नवनीत' कोणत्या निवासस्थान दुरुस्तीसाठी पडले खर्ची ?         

प्रजापत्र | Tuesday, 28/07/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.२७ (प्रतिनिधी)-बीड शहराच्या ईमामपूर,समनापूर आणि परिसरातील डोंगरांमधून मोठ्याप्रमाणावर मुरुमाचे बेकायदा उत्खनन होत असल्याचे चित्र आहे. महामार्ग आणि रेल्वेसाठी उत्खनन झाल्याचे दाखवून सर्रास अजूनही डोंगर घुसळून मुरुमाचे 'नवनीत' काढले जात आहे. हे नवनीत मागच्या काळात नेमके कोणाच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी खर्ची पडले हा आता चर्चेचा विषय आहे.
बीड जिल्ह्यात गौण खनिजांची तस्करी,अवैध उपसा हा तसा नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे.गेवराई तालुक्यातील वाळू उपशाचे प्रकरण आणि यात अधिकाऱ्यांवर झालेले आरोप ताजे असतानाच आता बीड तालुक्यात इमामपूर,समनापूर आणि इतर परिसरातील डोंगर घुसळून (पोखरून) काढण्यात आलेले मुरुमाचे 'नवनीत' सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.बीड जिल्ह्यातून मागच्या काळात राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वेच्या कामांसाठी मोठ्याप्रमाणावर मुरुमाचे उत्खनन झाले होते. मात्र आता त्याचाच आधार घेऊन कोणतेही उत्खनन मागील काळातले असल्याचे भासवण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. गेल्या काही काळात अनेक ठिकाणी निवासस्थान दुरुस्ती आणि बांधकामांसाठी असेच डोंगर घुसळून निघालेले मुरुमाचे 'नवनीत' (लोणी) वापरण्यात आले आणि त्यातून खाली खचलेले निवासस्थान वर उचलून त्याचा पृष्ठभाग लोण्यासारख्या गुळगुळीत करण्यात आला.त्यामुळे आता मागील काही काळात कोणत्या कामांसाठी असा बेकायदा मुरूम वापरण्यात आला आणि त्यातून कोणाला 'खुशी' झाली हा देखील सामान्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.

Advertisement

Advertisement