बीड दि.२४ (प्रतिनिधी): दिवसा गावात रेकी करून रात्री घरफोड्या करणाऱ्या टोळीतील एका अट्टल चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ जुलै रोजी एका घरात रात्रीच्या वेळी घरफोडी करून कपाटातील सोन्याचे दागिने चोरीस नेण्यात आले होते. तसेच गावातील इतर महिलांच्या अंगावरील दागिनेही चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दाखल झाली होती. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे कृष्णा शेषेराव राठोड (वय २५), रा. अंबुनाईक तांडा, गेवराई याला नाळवंडी तांड्यातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पाच साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. या टोळीतील इतर पाच आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. आरोपीने वडवणी तालुक्यातील खापरवाडी तांड्यातही घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे पिंपळनेर आणि वडवणी पोलीस ठाण्यातील एकूण दोन गुन्हे उघडकीस आले.आरोपीकडून सुमारे तीन तोळे सोने, १० भार चांदी असा एकूण पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी व जप्त माल पुढील तपासासाठी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरील कारवाई नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक, बीड, वेंकटराम, सहा. पोलीस अधीक्षक, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.शिवाजी बंटेवाड,पोउपनि शेखर औटे, महेश विघ्ने, पोह.विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, गोवींद राख, पोअं.बबन सलगर, आशपाक सय्यद, चालक सिध्देश्वर मांजरे, सुनिल राठोड यांनी केली आहे.

