Advertisement

 अंगणवाडीचा पोषण आहार विक्रीचा प्रकार उघड

प्रजापत्र | Tuesday, 21/07/2026
बातमी शेअर करा

भूम : तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील अंगणवाडीतील बालकांसाठी येणारा पोषण आहार खाजगी वाहनातून विक्रीसाठी नेला जात असल्याचा कथित प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आणला.या घटनेनंतर एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून संबंधित अंगणवाडी सेविकेविरुद्ध प्रशासकीय कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

    अंगणवाडी क्रमांक ५०७ मधील पोषण आहार एमएच-१४-एचजी-०२५२ क्रमांकाच्या खाजगी वाहनात भरला जात असल्याची माहिती बालविकास प्रकल्प कार्यालयाला देण्यात आली. त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश तुकडे यांनी कर्मचारी इंगळे यांच्यासह घटनास्थळी भेट दिली.पाहणीदरम्यान पोषण आहाराचा साठा खाजगी वाहनात तसेच रस्त्यावर आढळून आला. प्राथमिक चौकशीत गर्भवती महिला, स्तनदा माता, किशोरी मुली आणि इतर पात्र लाभार्थ्यांना वितरित करावयाचा पोषण आहार अनधिकृतपणे बाहेर काढल्याचे निदर्शनास आल्याची माहिती प्रशासनाने दिली.घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून संबंधित सेविकेविरुद्ध शासकीय नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश तुकडे यांनी दिली. पंचायत समितीच्या सभापतींच्याच गावात हा प्रकार उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली असून, लाभार्थ्यांच्या हक्काच्या पोषण आहाराची अफरातफर झाल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Advertisement

Advertisement