Advertisement

  मध्य महाराष्ट्र- मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

प्रजापत्र | Thursday, 16/07/2026
बातमी शेअर करा

मुंबई  : राज्यात उन्हाचा चटका वाढला असतानाच हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता असून, विदर्भात मात्र उकाडा आणि उन्हाचा चटका कायम राहणार आहे.मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा जम्मूपासून देहरादून, शाहजहानपूर, पटना, बंकुरा येथून पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार परिसरात समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे फिरत आहेत. गुजरात परिसरात ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर तर उत्तर प्रदेशात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. 

   राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिल्याने कमाल तापमान ३३ ते ३७ अंशांच्या दरम्यान आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडत आहेत, तरीही उकाडा तापदायक ठरत आहे.आज मध्य महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात विजांसह सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागांत हलक्या सरींसोबत उन्हाचा चटका कायम राहील.
 

Advertisement

Advertisement