बीड दि.१४ (प्रतिनिधी): येथील जिल्हा रुग्णालयातील एक कर्मचारी कर्तव्यावर हजर असतांना मद्यपान करून आल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे शल्यचिकित्सक डॉ.सतिशकुमार सोळंके यांनी घेतलेल्या वार्डाच्या राऊंडमध्येच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने सदरील कर्मचाऱ्याला तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे.
जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ.सतिशकुमार सोळंके यांनी सोमवार (दि.१३) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वार्ड क्र. ४८ मध्ये राऊंड घेतला. त्यावेळी कर्तव्यावर असलेले कंत्राटी अधिपरिचारिका किरणकुमार अनिल लोंढे यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णांना दिलेल्या उपचाराबाबत असमाधानकारक माहिती दिली, त्याचबरोबर ते कर्तव्यावर मद्यप्राशन करून आले होते असेही डॉ.सोळंके यांच्या निदर्शनास आले.त्याची दखल घेत रूग्णसेवेतील कर्तव्याप्रती निष्काळजीपणा, असभ्य वर्तन दिसुन आल्याने संबंधित कर्मचारी लोंढे यास आज तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे.या घटनेनंतर शल्यचिकित्सक डॉ.सोळंके यांनी आज जिल्हा रूग्णालयातील सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.या बैठकीत त्यांनी कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली असुन कडक शब्दात तंबी देखील दिली आहे.रुग्णांची सेवा आणि त्यांचे आरोग्य हीच आपली पहिली प्राथमिकता आहे, रुग्णसेवेत कोणताही निष्काळजीपणा, ड्युटीवर मद्यप्राशन करणे किवा असभ्य वर्तन यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाही अशा सुचना त्यांनी अधिकारी,कर्मचाऱ्यांना दिल्या. असा प्रकार पुन्हा आढळल्यास थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येईल अशी तंबी देखील डॉ.सोळके यांनी अधिकारी,कर्मचाऱ्यांना दिली.

बातमी शेअर करा
