केज दि.१२(प्रतिनिधी): तालुक्यातील साळेगाव येथील ३२ वर्षीय तरुण शेती मशागतीचे काम करत असताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे लातूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. मंगेश बाबुराव टोपे असे या मृत तरुणाचे नाव आहे.तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली.
केज तालुक्यातील साळेगाव येथील मंगेश टोपे मंगळवार (दि.२) जून रोजी हा आपल्या शेतात खरीप हंगामापूर्वीची मशागत करत होता. यादरम्यान ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट चालू रोटाव्हेटरमध्ये अडकला. या भीषण अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती, तसेच पाय फॅक्चर होऊन कानालाही मोठी इजा झाली होती. अपघात झाल्यानंतर मंगेशला तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी (दि.११) मध्यरात्री १:३० च्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. मंगेश अत्यंत गरीब कुटुंबातील असून तो मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या या अचानक आणि अपघाती जाण्याने साळेगाव व परिसर हळहळत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई-वडील असा परिवार आहे. घराचा कमावता आधार गेल्याने टोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रजापत्र | Friday, 12/06/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
